जामनेरला खोदलेल्या रस्त्यात वाहन उलटल्याने ४०० कोंबड्या मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 04:36 PM2019-12-02T16:36:31+5:302019-12-02T16:37:55+5:30
भुयारी गटारीसाठी खोदलेला रस्ता रात्री बुजल्यानंतर सकाळी जलवाहिनी फुटल्याने माती वाहून गेली व खड्डा तसाच राहिल्याने त्यात पीकअप व्हॅन पडल्याने त्यातील ४०० कोंबड्या मृत्युमुखी पडल्याची घटना सोमवारी पहाटे पाचला येथे घडली.
जामनेर, जि.जळगाव : भुयारी गटारीसाठी खोदलेला रस्ता रात्री बुजल्यानंतर सकाळी जलवाहिनी फुटल्याने माती वाहून गेली व खड्डा तसाच राहिल्याने त्यात पीकअप व्हॅन पडल्याने त्यातील ४०० कोंबड्या मृत्युमुखी पडल्याची घटना सोमवारी पहाटे पाचला येथे घडली.
शहरातील अराफत चौकात भुयारी गटारीच्या कामासाठी रस्त्याचे खोदकाम होत आहे. रविवारी ठेकेदाराने रस्ता खोदून गटारीचे पाईप टाकले. त्यानंतर माती टाकून बुजण्यात आले. त्यापुढे खोदण्यात आलेल्या रस्त्याला लागून जलवाहिनी आहे. सोमवारी सकाळी नळाला पाणी सोडण्यात आल्यानंतर जलवाहिनी फुटली व जो खड्डा रविवारी मातीने बुजला होता. त्यात पाणी शिरल्याने वरील भाग भुसभुशीत झाला. सकाळी त्या रस्त्यावरून मालेगाव येथून कोंबड्या घेऊन येत असलेली पीकअप व्हॅन फसल्याने उलटली व त्याखाली दबल्याने सुमारे ४०० कोंबड्या मरण पावल्या.
शेख कामिल (राहणार अजिंठा ) यांचे हे वाहन असून, सुमारे ७० हजारांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर याच ठिकाणी दोन ट्रॅक्टर फसल्याने काही काळ वाहतूक बंद पडली.
दरम्यान, गांधी चौक ते जुना बोदवड नाक्यापर्यंतच्या रस्त्यावर दुभाजक टाकले असून, एक बाजू अतिक्रमणामुळे गेल्या १० वर्षांपासून बंद आहे. परिणामी एकेरी वाहतूक होत आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यावरील अतिक्रमणात वाढ होत आहे. तलाठी कार्यालयाजवळ पालिकेने प्रवेशद्वारावर अवजड वाहनांना प्रवेश बंदीचा फलक तीन वर्षांपासून लावला आहे. मात्र तो केवळ शोपीस ठरत आहे. पालिकेने या ठिकाणी अवजड वाहन बंदीसाठी कार्यवाही करण्याबाबत ठरावदेखील केलेला आहे. मात्र कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.