पारोळा येथे शॉर्ट सर्किटने दोन घरांना आग, तीन लाखांंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 10:59 PM2021-06-19T22:59:10+5:302021-06-19T23:00:04+5:30
शॉर्ट सर्किट झाल्याने गढरी गल्लीतील दोन घरांना आग लागून घरातील संपूर्ण संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : मध्यरात्री शॉर्ट सर्किट झाल्याने गढरी गल्लीतील दोन घरांना आग लागून घरातील संपूर्ण संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले. त्यामुळे सुमारे तीन लाखाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
दिनांक १८ रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास गढरी गल्ली येथील रहिवासी बापू रतन पाटील व बायजाबाई रतन पाटील (गढरी गल्ली) यांच्या घराच्या छताला अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने घराला आग लागली होती. मध्यरात्रीच्या सुमारास परिसरात एकच धांदल उडाली होती. यावेळी गल्लीतील लोकांनी पाण्याने बादलीच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु आग जोरात असल्याने ती विझत नव्हती. अशावेळी पारोळा नगरपालिकेचा अग्निशमन दलाचा बंब दाखल झाला.
अग्निशमन दलाचे कर्मचारी मनोज पाटील, संदीप चौधरी, विशाल पाटील व नगरसेवक मनीष पाटील, कैलास पाटील व रहिवाशांच्या मदतीने आग विझवण्यात आली; परंतु आग इतकी जोरात लागली होती की, या दोन्ही घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या होत्या. यात त्यांचे फार मोठे नुकसान झाले होते. दुपारच्या सत्रात शहर तलाठी निशिकांत माने, प्रशांत निकम यांनी पंचनामा करून सुमारे दोन लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली.