दोन घटनांमध्ये तुफान हाणमारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 01:35 AM2019-08-25T01:35:51+5:302019-08-25T01:35:56+5:30
सकाळी सुभाष चौकात तर रात्री नेरी नाक्यावर तणाव
जळगाव : शहरात शनिवारी सुभाष चौकात तर रात्री नेरी नाका परिसरात दोन गटात वाद उफाळून आला. त्यामुळे दोन्ही गट समोरासमोर आल्याने तुफान हाणामारी झाली. त्यात दगडफेक व लोखंडी रॉडचा वापर झाला. दोन्ही घटनेत पाच जण जखमी झाले असून एकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हातगाडी लावण्याच्या कारणावरुन सुभाष चौकरात दोन हॉकर्समध्ये शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता जोरदार हाणामारी झाली. त्यात शेख इम्रान शेख एजाजुद्दीन (२२, रा.शाहू नगर) याने राजू सखाराम पाटील (४० , रा. कासमवाडी) याच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकल्याने तो जागीच कोसळला. या घटनेने सुभाष चौकात पळापळ होऊन तणावाची स्थिती निर्माण झाली होती. एजाजुद्दीन शेख याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, जखमी राजू याला रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून तेथे २४ टाके घालण्यात आले आहेत. या घटनेतील दुसरा शेख इम्रान यालाही दुखापत झाली असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन गटातील या वादामुळे परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
इम्रान शेख व राजू पाटील या दोघांमध्ये शनिवारी सकाळी हातगाडी लावण्यावरुन कडाक्याचे भांडण झाले. त्यात शेख इम्रान याने राजू पाटील याच्या डोक्यात लोखंडी पाईप टाकला. भांडण सोडविण्यासाठी आलेली राजूची आई सुशिलाबाई व मुलगा दुर्गेश यांनाही मारहाण झाली. त्यामुळे हॉकर्स व ग्राहकांमध्ये पळापळ झाली. तणावाची स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. सहायक पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन निरीक्षक विठ्ठल ससे, शहरचे अरुण निकम, दिलीप भागवत यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
जखमी दहा मिनिटे रक्ताच्या थारोळ्यात
या घटनेत डोक्याला मार लागल्याने राजू पाटील जमिनीवर कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात असल्याने लोकांमध्येच भीती निर्माण झाली होती. तर आई मदतीसाठी याचना करीत होती. दहा मिनिटे राजू जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. नतर त्याला रुग्णालयात हलविण्यात आले.