अमळनेर तालुक्यात रणाईचे येथे दोन खळ््यांना आग लागून सहा लाखाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 10:47 PM2019-03-29T22:47:45+5:302019-03-29T22:48:02+5:30
पिंगळवाड्यालाही आगीत घराला आग
अमळनेर : उष्णतेमुळे अचानक दोन खळ््यांना आग लागल्याने ३ म्हशी गंभीर जखमी होऊन चारा व शेती अवजारे जळून ६ लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तालुक्यातील रणाईचे येथे घडली. यासोबतच पिंगलवाडे येथेही घर जळून ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.
रणाईचे येथील दिलीप अजबराव पाटील तसेच आधार राघो पाटील यांच्या खळ््याला सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्या वेळी चाऱ्याने तत्काळ पेट घेतल्याने चाहुबाजुने आगीचे लोळ उठले. खळ्यात म्हशी बांधलेल्या असल्याने त्या ओरडू लागल्या. त्या वेळी गावकऱ्यांनी धाव घेत मिळेल त्या साधनाने पाणी मारणे सुरू केले. मात्र उष्णतेमुळे जवळ उभे राहणे ही कठीण झाले होते. त्याचवेळी रणाईचे येथून जानव्याला पिण्याचे पाण्याचे टँकर नेणाºया चालकाला दुरून आग दिसली त्या वेळी तो २ किमी अंतरावरून मागे परतला आणि टँकरमधील पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. तरीही आग आटोक्यात आली नाही. त्या वेळी नगरपालिकेचे दोन बंब मागविण्यात आले. अग्निशमन प्रमुख नितीन खैरनार, फारुख शेख, जाफर खान, मच्छिंद्र चौधरी, दिनेश बिºहाडे, भिका संदानशीव, रफिक खान, आकाश बाविस्कर यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. दोन तासानंतर आग आटोक्यात आली. आगीत दिलीप पाटील याच्या मालकीचा तीन लाखाचा चारा व एक लाखाचे शेती अवजारे जळून खाक झाले तर आधार राघो पाटील यांचे २ लाखाचे नुकसान झालयाचे सांगण्यात आले. गावकऱ्यांनी तीन म्हशी खळ््यातून बाहेर काढल्या. म्हशी गंभीर जखमी झाल्या.
पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.बी.भोई, एस. बी .रामोळ, एम. एस. पाटील, पी. ए. पाटील यांनी वेळीच म्हशींवर उपचार केल्याने म्हशींचे प्राण वाचले. तलाठी बाविस्कर यांनी पंचनामा केला.
तालुक्यातील पिंगलवाडे येथे २८ रोजी रात्री साडे अकरा वाजता लागल्याने गौतम दगा पारधी यांच्या घराला आग लागल्याने कपडे व वस्तूंसह संपूर्ण घर जळून खाक झाले. यात सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. अमळनेर नगरपरिषदेच्या बंबाने आग विझवली.