दुचाकी अपघातात दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:03 PM2019-03-24T12:03:34+5:302019-03-24T12:04:45+5:30
चारचाकी वाहनाने दिली धडक
जळगाव/जामनेर : मंडप घेण्यासाठी येत असलेल्या तरुणांच्या दुचाकीला चारचाकीने जोरदार धडक दिली. त्यात दोन्ही तरुण ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता शहापूर, ता.जामनेर गावाजवळ घडली. योगीराज किसन राठोड (३५), आणि श्यामराव विष्णू चव्हाण (१८, दोन्ही रा. घाणेगाव तांडा, ता.सोयगाव, जि. जळगाव) अशी या ठार झालेल्यांची नावे आहेत.
श्यामराव व योगीराज यांचा मंडपचा व्यवसाय आहे. लग्नसराई सुरु असल्याने त्यांनी दोन दिवसापूर्वी जळगावात मंडप वॉश्ािंगसाठी टाकलेला होता. मंडप घेण्यासाठी दोन्ही जण शनिवारी सकाळी दुचाकीने जळगाव यायला निघाले असता शहापूर गावाजवळ भरधाव वेगाने आलेल्या चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात डोक्याला जबर मार लागल्याने योगीराज याचा जागेवरच मृत्यू झाला. तर श्यामराव याला शासकीय रुग्णवाहिकेतून जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली असावी. रुग्णवाहिकेतील डॉ. जुगल वाडीले व चालक दत्तात्रय पाटील यांनी त्याला वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. दरम्यान, योगीराज याचा मृतदेह जामनेर येथे नेण्यात आला.