फापोरे येथे भरदिवसा घरातून दोन लाखाचे सोन्याचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 10:34 PM2020-12-31T22:34:57+5:302020-12-31T22:35:21+5:30
घराचे कुलूप उघडून सुमारे दोन लाखाचे ५० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना ३१ रोजी दुपारी २ वाजेदरम्यान फापोरे येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : पती शेतात गेले असताना व पत्नी गावातच सांजोऱ्या लाटायला गेली असताना चोरट्याने घराचे कुलूप उघडून सुमारे दोन लाखाचे ५० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना ३१ रोजी दुपारी २ वाजेदरम्यान फापोरे येथे घडली.
तालुक्यातील फापोरे येथील किशोर युवराज पाटील हे ३१ रोजी सकाळी ९ वाजता शेतात निघून गेले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी गावातील नातेवाईक अमृतराव पाटील यांच्या घरी सांजोऱ्या करण्यासाठी गेल्या, त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावून घराची किल्ली तुळशी वृंदावन खाली ठेवली. दुपारी ३ वाजेला त्या परत आल्यावर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्याना पती परत आले असतील असे वाटले. मात्र ते घरात आढळून आले नाही. म्हणून त्यांनी घरत अधिक शोधाशोध केली असता त्यांना त्यांच्या लोखंडी कपाटातील ३० हजाराचा १० ग्रॅम सोन्याचा नेकलेस, ३६ हजार रुपये किमतीची १२ ग्रॅमची सोनसाखळी, ६९ हजार रुपयांचा २३ ग्रॅम वजनाची सोनसाखळी, १२ हजार रुपये किमतीचा ४ ग्रॅम सोन्याचा तुकडा, साडेचार हजार रुपयांचा दीड ग्राम सोन्याचा तुकडा असे एकूण ५० ग्रॅम सोने एक लाख ८७ हजार ५०० रुपयांचे अज्ञात चोरट्याने चोरून नेले.
घटनेचे वृत्त समजताच पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. विशेष म्हणजे चोरट्याने घरातील वस्तू अस्ताव्यस्त करताना चांदीचे दागिने व इतर वस्तू याना हात न लावता त्या वस्तू तशाच पडू दिल्या. त्यामुळे चोरट्याचा फक्त सोने चोरण्याचा उद्देश असावा आणि लपवलेली किल्ली शोधून किल्लीने कुलूप उघडून चोरी केल्याने चोर परिचितांमधील असावा किंवा घरावर लक्ष ठेवून असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तपास सुभाष महाजन करीत आहेत.