कजगाव येथे दोन लाख तीन हजाराचा गुटखा, पानमसाला जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 01:37 PM2018-07-05T13:37:54+5:302018-07-05T13:38:40+5:30
गुन्हे दाखल होणार
जळगाव : राज्यात बंदी असताना गुटखा, पानमसाला, सुगंधीत सुपारी यांचा राजरोसपणे साठा करून विक्री करणाऱ्या कजगाव येथील दुकान व गोदामावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकून दोन लाख तीन हजाराचा माल जप्त केला. या प्रकरणी संबंधित मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.
गुप्त माहिती मिळाल्यावरून अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त वाय.के. बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील, अनिल गुजर यांनी कजगाव येथे जाऊन ही कारवाई केली. यामध्ये कजगाव येथील स्टेशन रस्त्यावरील जितेंद्र टाटिया यांच्या मालकिच्या गुरुप्रसाद प्रोव्हिजन या दुकानावर प्रतिबंधीत मालाची विक्री होत असल्याचे आढळून आले. त्या वेळी पथकाने या दुकानावरून १० वेगवेगळ््या प्रकारचा प्रतिबंधीत माल जप्त केला. त्याची किंमत एक लाख २० हजार असल्याची माहिती विवेक पाटील यांनी दिली.
दुसºया एका कारवाईत कजगाव येथेच नरेंद्र माणकचंद धाडीवाल यांच्या मालकीच्या गोदामात छोटू इंदरचंद जैन यांच्या मालकीचे पानमसाला, सुगंधीत तंबाखूचे १२ पोते आढळून आले. ८३ हजार रुपये किंमतीचा हा मालदेखील पथकाने जप्त केला.
संबंधितांवर अन्न सुरक्षा मानके कायद्यान्वये कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती विवेक पाटील यांनी दिली. तसेच जप्त माल सहायक आयुक्त बेंडकुळे यांच्या आदेशानुसार नष्ट करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
कारवाई सुरूच राहणार
राज्यात बंदी असलेल्या गुटखा, पानमसाला, सुगंधीत सुपारी तसेच तंबाखूची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विक्री व साठा होत असल्याने त्यास आळा बसविण्यासाठी ही कारवाई सुरूच राहील, अशी माहिती वाय.के. बेंडकुळे यांनी सांगितले.