शेतकरी कर्जमाफीसंदर्भातील तक्रारींच्या निवारणासाठी आठवड्यातून दोन बैठका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:42 AM2019-07-18T11:42:50+5:302019-07-18T11:43:38+5:30
बँक अधिकारी, लेखापरीक्षकांचीही राहणार उपस्थिती
जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने संदर्भात आलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुकास्तरीय समितींची स्थापना करण्यात आली आहे. समितीला आता प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी व गुरुवारी बैठका घ्याव्या लागणार आहेत.
दरम्यान, तालुकास्तरीय समितीची पहिली बैठक १८ जुलै रोजी घेण्याचे निर्देश सहकार विभागाने दिले होते. मात्र अद्याप या संदर्भातील अजेंडा संबंधित यंत्रणांपर्यत पोहचू शकलेला नसल्याने आता सोमवार, २२ रोजीच पहिली बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शेतकरी कर्जमाफीसंदर्भात अनेकांचे तक्रारी असल्याने त्या तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने तालुकास्तरीय समितींची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १५ जुलै रोजी आयुक्त कायार्लायाने पत्र देऊन या समित्यांनी करावयाच्या कामांबाबत सूचित केले आहे. समितीने प्रत्येक सोमवारी व गुरुवारी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत बैठका घेऊन प्राप्त तक्रारींचे निवारण करावयाचे आहे. शासन निर्णय कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावणे, कार्यवाहीचा अहवाल त्याच दिवशी सादर करण्याविषयी निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा अग्रणी प्रबंधक व कार्यकारी संचालकांनीही आपल्या बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना समितीच्या प्रत्येक होणाऱ्या बैठकीस उपस्थित राहावे लागणार आहे.
जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी त्यांच्या तालुका स्तरावरील लेखापरीक्षकांना सभेस आवश्यक माहितीसह उपस्थितीत राहण्या विषयी सूचित केले आहे. तसेच जिल्हा देखरेख सहकारी संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विका संस्थेच्या गटसचिवाच्या सूचित करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. बँक अधिकारी, सहकारी संस्थांना अजेंडा पाठविण्याची प्रकिया सुरू आहे.
प्राधान्याने कामे करा
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत शेतकºयाच्या लाभाशी व कर्जवाटपाशी संबंधित हा विषय असल्यामुळे या कामी प्रथम प्राधान्य देऊन कार्यवाही मुदतीत पार पाडावी, असे स्पष्ट निर्देश सहकार विभागाने सहाय्यक निबंधकांना दिले आहेत.