एटीएम लांबविणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:57 PM2020-01-22T12:57:02+5:302020-01-22T12:57:20+5:30

जळगाव : एटीएम मशीन ट्रॅक्टरला बांधून लांबविणे व मशीन फोडून त्यातील रोकड लांबविणाºया टोळीतील दोन सदस्यांना पकडण्यात स्थानिक गुन्हे ...

 Two men arrested for extending ATMs | एटीएम लांबविणाऱ्या दोघांना अटक

एटीएम लांबविणाऱ्या दोघांना अटक

Next

जळगाव : एटीएम मशीन ट्रॅक्टरला बांधून लांबविणे व मशीन फोडून त्यातील रोकड लांबविणाºया टोळीतील दोन सदस्यांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. भुरा बाळु गायकवाड (२५) व आनंद गुलाब धुडकर (२५) रा. भिलाटी, ता.बोदवड अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्या शोधार्थ पोलिसांनी बोदवडमधील तब्बल ५० एकर जंगल पिंजून काढले. दरम्यान, या टोळीतील आणखी सात जण फरार आहेत.
जामठी, ता.बोदवड येथे १३ जानेवारीच्या रात्री टाटा इन्डीकॅश कंपनीचे एटीएम मशीन लांबविण्याचा प्रयत्न झाला होता, तर त्याच दिवशी एटीएमच्या शेजारीच संदीप माळकर यांच्या मालकीच्या पानटपरीचे कुलुप तोडून टपरी मधील पान मसाला व सिगारेटचा साठा लांबविण्यात आला होता. तसेच आदल्या दिवशी बोदवड शहरातील शांतीलाल पुखराज जैन यांच्या मालकीचा १ लाख ३६ हजार रुपये किमतीचे मका मार्केट यार्डमधून लांबविण्यात आला होता. याप्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल होता.
तलावाकाठी दारु अन् धिंगाणा
एटीएम मशीन व मका लांबविणाऱ्यांमध्ये बोदवडमधीलच ९ जणांची टोळी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे दीपक पाटील यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले व अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्याशी याबाबत चर्चा करुन पथक स्थापन केले. सहायक फौजदार अशोक महाजन,राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील, अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, दीपक पाटील, अशरफ शेख, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर , दादाभाऊ पाटील, दीपक छ.पाटील, अशोक पाटील तसेच विजय पाटील व नरेंद्र वारुळे अशांना बोदवड मुक्ताईनगर परिसरात रवाना केले होते. यातील दोन जण उजनीच्या जंगलात तलावाकाठी दारु पिवून धिंगाणा घालत असल्याची माहिती मिळताच पथकाने मोर्चा वळविला.

एटीएममध्ये २५ लाखाची असल्याची माहिती; निघाले ३ हजार
जामठी येथील एटीएम मशीनमध्ये २५ लाख रुपये असल्याची माहिती या टोळीला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी ट्रॅक्टर, कुदळ, टीकम, फावडे व साखळदंड असे साहित्य नेवून मशीन उखडण्याचा प्रयत्न केला, मात्र गावकरी जागे झाल्याने त्यांनी तेथून पळ काढला. या मशीनमध्ये फक्त तीन हजार रुपये असल्याचे निष्पन्न झाले होते.

आणखी सात नावे उघड
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी एटीएम व मका लांबविल्याची कबुली दिली, त्याशिवाय या गुन्ह्यात शंकर जंगलु ठाकरे, गोविंदा अर्जुन गायकवाड, आकाश हरचंद गायकवाड, सदाशिव पंढरी पवार, किसन उर्फ शेंडया कैलास सोनवणे, किसन संजय मोरे, प्रविण सुकलाल घुडकर यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. या सर्वांनी ट्रॅक्टर सोबत नेऊन कुदळीने जमिन खोदून एटीएम मशीनचओढून नेण्याचा प्रयत्न केला.

Web Title:  Two men arrested for extending ATMs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.