नॉन कोविडसाठी पुन्हा दोन बैठका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:33 AM2020-12-15T04:33:17+5:302020-12-15T04:33:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नॉन कोविड सुविधा सुरू करण्यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडून अत्यंत सूक्ष्म ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नॉन कोविड सुविधा सुरू करण्यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडून अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात येत असून अचानक काही अडचणी उद्भवू नये म्हणून बैठकांचे सत्र सुरू करण्यात आले आहे. सोमवारी कॉलेज कॉन्सिलची मुख्य बैठक झाली. दरम्यान, सर्व नियोजन प्रशासक डॉ. बी. एन. पाटील यांना कळविण्यात आले असून यात १७ डिसेंबरपासून ही सुविधा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे कळविण्यात आले आहे.
गेल्या महिनाभरापासून कोविड -नॉन कोविड याबाबत विचारविनियम सुरू आहे. अनेक बैठका, आढावा यानंतर आता ही सुविधा १७ डिसेंबरला सुरू होणार आहे. यासाठी कॉलेज कॉन्सिलची अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या दालनात तासभर बैठक पार पडली. सर्व विभागप्रमुखांकडून यावेळी पुन्हा एकदा येणाऱ्या अडचणी, काय मार्ग काढता येतील, कसे नियोजन करता येईल, याबाबत अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी चर्चा केली. स्टॅडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस कशी राहणार यासाठी आणखी एक बैठक पार पडली. रुग्ण आल्यानंतर त्याला नेमके कोठे दाखल करावे, तपासणी कोणाची करावी, अन्य रुग्णांचे कसे नियोजन असेल याबाबत या दोनही बैठकांमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.
जुना आयसीयू कोविडसाठी
नव्या नियोजनानुसार आता जुना अतिदक्षता विभाग ज्याचे नूतनीकरण झाले आहे. तो कोविडच्या गंभीर रुग्णांसाठी तर १४ क्रमांकाचा अतिदक्षता विभाग हा नॉन कोविडच्या गंभीर रुग्णांसाठी राहणार आहे. यासह सी १, सी २, सी ३ या कक्षांमध्ये कोविडचे नियोजन करण्यात आले आहे.
त्या डॉक्टरांबाबत अद्याप निर्णय नाही
जिल्हा रुग्णालयातील अपघात विभाग हा आयुर्वेद महाविद्यालयाला हलविण्यात आला होता. जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टरही यात नॉन कोविडसाठी आयुर्वेद महाविद्यालयात गेले होते. दरम्यान, या डॉक्टरांना पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बोलवायचे किंवा नाही, याबाबत अद्याप निर्णय नसल्याची माहिती आहे.