ममुराबादला प्रत्येक वाॅर्डात दोन पॅनल आमनेसामने?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:14 AM2020-12-29T04:14:06+5:302020-12-29T04:14:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे भरण्याची प्रक्रिया सुरू असतांनाच अनेकांनी प्रत्येक वाॅर्डात सोयीनुसार दोन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे भरण्याची प्रक्रिया सुरू असतांनाच अनेकांनी प्रत्येक वाॅर्डात सोयीनुसार दोन किंवा तीन उमेदवार मिळून स्वतंत्र पॅनलच्या निर्मितीवर भर दिला आहे. भाऊबंदकीसह जातीपातीच्या राजकारणाला त्यामुळे एक प्रकारे चालना मिळाल्याचे दिसत आहे.
ममुराबाद येथे सहा वाॅर्डातील एकूण सुमारे १७ जागांसाठी यंदा ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. गावातील विविध जाती-धर्माची वस्ती लक्षात घेता वाॅर्डनिहाय आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले आहे. त्यानुसार प्रत्येक वाॅर्डात सर्वसाधारण, ओबीसी, महिला राखीव, अनुसूचित जाती व जमाती या संवर्गातील जागांसाठी नामनिर्देशन पत्रे भरण्यासाठी संबंधित इच्छुकांनी जोरदार तयारीसुद्धा केली आहे. त्यापैकी अनेकांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे दिसून आले. तर काहींनी सावध भूमिका घेऊन शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यावर ठाम असल्याचे बोलून दाखवले. दरम्यान, ज्या वाॅर्डात तीन जागांसाठी निवडणूक होणार आहे तिथे आरक्षणनिहाय तीन उमेदवार उभे करून एकमेकांना धरून चालण्याच्या भूमिकेतून स्वतंत्र पॅनल तयार करण्याच्या बाबतीत सगळीकडे चांगलीच चढाओढ दिसत आहे. सहा वाॅर्डात किमान १५-१६ पॅनलमध्ये तरी सरळ लढती रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकूण चित्र लक्षात घेता निवडणुकीत यंदा चांगलीच रंगत येण्याची चिन्हे असून ग्रामस्थांमध्येही त्याबद्दल उत्कंठा निर्माण झाली आहे.