जळगाव व्हेंटिलेटरच्या गोंधळात दोन रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:14 AM2021-04-26T04:14:53+5:302021-04-26T04:14:53+5:30
जळगाव : शहरात एका रुग्णालयात व्हेंटीलेटर असूनही त्याचा वापरच न झाल्याने रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला तर दुसऱ्या एका ...
जळगाव : शहरात एका रुग्णालयात व्हेंटीलेटर असूनही त्याचा वापरच न झाल्याने रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला तर दुसऱ्या एका रुग्णाला व्हेंटीलेटर न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अशा दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथील चावदास शंकर ताडे (वय-५५) यांचा गजानन हार्ट हॉस्पिटलमध्ये दुपारी १.२० वाजता मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला, व्हेंटीलेटर लावले नाही, वेळेवर डॉक्टर आले नाही, म्हणून रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला व कारवाईशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी येऊन डॉक्टरांशी चर्चा करून नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर दुपारी अडीच वाजता मृतदेह ताब्यात घेऊन चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुसऱ्या एका घटनेत एका ६२ वर्षीय रुग्णाला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, व्हेंटीलेटर न भेटल्याने मृत्यू झाला. नातेवाईकांनी शनिवारी दिवसभर व रात्रभर सर्व रुग्णालये पालथी घातली मात्र, त्यांना व्हेंटीलेटर मिळाले नाही. रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.