जीएमसीच्या सी टू कक्षात म्यूकरचे दोन रुग्ण दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:13 AM2021-05-28T04:13:31+5:302021-05-28T04:13:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविडमुक्त मात्र, म्यूकरमायकोसिस असलेल्या दोन रुग्णांना अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालयातील सी टू कक्षात दाखल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविडमुक्त मात्र, म्यूकरमायकोसिस असलेल्या दोन रुग्णांना अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालयातील सी टू कक्षात दाखल करण्यात आले आहे. गुरूवारपासूनच हा कक्ष सेवेत आला आहे. यात एका २६ वर्षीय तरूणीचा समावेश आहे. या कक्षात ६४ बेडची व्यवस्था आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात या आधी केवळ कोरोना बाधित रुग्णांना जर म्यूकरमायकोसिस झाला असेल तरच त्यांच्यावर उपचार केले जात होते. मात्र, आता कोविड रुग्णांची संख्या घटली असून शिवाय सीटू हा कक्ष मुख्य इमारतीच्या लांब असल्याने जे रुग्ण कोरोनामुक्त आहेत, मात्र, त्यांना म्यूकरचा त्रास आहे. अशा रुग्णांनाही उपचाराची व्यवस्था या रुग्णालयात करण्यात आली आहे. औषध वैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांच्याकडे या कक्षाची प्रमुख जबाबदारी आहे. दोनही रुग्णांची त्यांनी तपासणी केली.
तरूणीवर शस्त्रक्रिया
यातील २६ वर्षीय तरूणीला दोन महिन्यांपूर्वी कोविडची बाधा झाली होती. त्यातून बरे झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी या तरूणींचे दात दुखायला लागले, अशा वेळी सीटीस्कॅन केल्यानंतर थोडे निदान झाले. त्यानंतर तरूणीवर औरंगाबाद येथे उपचार करण्यात आले आणि नाशिक येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. तिथे पाच दिवस उपचार सुरू ठेवल्यानंतर अखेर गुरूवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रौढाच्या डोळ्यांना इजा
या कक्षात एका प्रौढ व्यक्तिला दाखल करण्यात आले असून त्यांच्या डोळ्यावर सूज आलेली आहे. कोविडमधून बरे झाल्यानंतर त्यांना हा त्रास सुरू झाला असून नेत्ररोगततज्ञांकउून त्यांची तपासणी करण्यात आली.