जळगाव जिल्हा रुग्णालयात पुन्हा एका खाटेवर दोन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:10 PM2018-10-07T12:10:41+5:302018-10-07T12:11:59+5:30
रुग्णाचे हाल
जळगाव : जिल्हा रुग्णालयात जागेचा प्रश्न बिकट बनला असताना शनिवारी पुन्हा रुग्णांची संख्या वाढल्याने एका खाटेवर दोन रुग्ण टाकण्याची वेळ आली. दिवसेंदिवस येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून सुविधा नसल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. यात शनिवारी तर म्हसावद येथील सर्पदंश झालेल्या एका महिलेला जागाच नसल्याने वेगवेगळ््या कक्षात पाठविण्यात आले, मात्र कोठेच जागा न मिळाल्याने महिलेला उपचारासाठी ताटकळत बसावे लागले.
थंडी-तापाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने तसेच सर्पदंश, विषप्राशनच्या रुग्णांचीही संख्या वाढल्याने विविध कक्षांमध्ये जागा कमी पडत आहे. शनिवारी तर सकाळपासूनच रुग्णांची संख्या वाढल्याने एकेका खाटेवर दोन रुग्ण टाकावे लागले.
त्यानंतर तालुक्यातील म्हसावद येथील शोभाबाई संतोष महाजन या सर्पदंश झालेल्या महिलेला जिल्हा रुग्णालयात आणले असता सदर महिलेच्या उपचारासाठी जागाच नसल्याने तिला या कक्षातून त्या कक्षात जाण्यासाठी सांगण्यात आले. तब्बल दीड तास ही महिला उपचाराविना फिराफीर करीत होती. अखेर काही जणांनी या विषयी आवाज उठविला त्या वेळी महिलेवर उपचार करण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या वेळी उपचाराची मागणी केली असता कर्मचाºयांनी अरेरावी केल्याचा तसेच वैद्यकीय अधिकारी जागेवर नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यानंतर हिरालाल वसंत भील (रा. पंचक, ता. चोपडा) व रहिम सुलतान (रा. जलचक्र, ता. बोदवड) या सर्पदंश झालेल्या रुग्णांनाही फिराफीर करावी लागली.
गर्दी वाढल्याने अनेक रुग्णांना बसवून अथवा उभ्यानेच इजेक्शन दिले जात होते.