दोन मोर आढळले मृतावस्थेत
By admin | Published: February 6, 2017 12:59 AM2017-02-06T00:59:04+5:302017-02-06T00:59:04+5:30
वडाळी : एकाला ग्रामस्थाकडून मिळाले जीवदान, राष्ट्रीय पक्ष्यांची हेळसांड
वाकोद, ता जामनेर : येथून जवळच असलेल्या वडाळी शिवारातील एका शेतालगत रविवारी सकाळी दोन मोर मृतावस्थेत आढळले. दरम्यान, एका मोराला शेतक:याच्या मदतीने जीवदान मिळाले.
वडाळी शिवारातील शेतातून शेती कामानिमित्त जाणारा येथील तरुण गजानन भरत पांढरे याला शेताच्या रस्त्यावर दोन मोर मृतावस्थेत आढळले व बाजूला एक कुत्रा तिस:या मोराच्या मागे धावताना दिसला. गजानन याने कुत्र्याचा पाठलाग करून त्या मोराला वाचवले. मात्र त्या मोराच्या तोंडातून लाळ गळत होती. त्या मोराने कोणते तरी विषारी द्रव सेवन केलेले असावे, असा अंदाज करून उपचारासाठी गजानन पांढरे व गावातील काही मित्रांना घेऊन तो वाकोद येथील प्रथम श्रेणी पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन आला. मात्र दवाखाना बंद असल्याने विशाल जोशी व काही युवकांकडे मोराला नेऊन संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी व वनविभागाच्या कर्मचा:यांना कळविण्यास सांगितले .
या युवकांनी तत्काळ वाकोद येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.गंदीगुळे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली असता ‘मी औरंगाबादला घरी असून आमचा कर्मचारी लग्नाला आहे व डॉ.चिंचोले म्हसावद येथे राहत असल्याने तुम्ही वनविभागाशी बोलणे करा, ते बघतील, असे सांगून जबाबदारी झटकली, असा आरोप या वेळी करण्यात आला. नंतर वनपाल कानडे यांच्याशी संपर्क केला असता मी जळगावी असून, मी आमच्या कर्मचा:यांना पाठवतो म्हणून सांगितले. सांगितल्याप्रमाणे त्यांनी वनविभागाचे जीवन पाटील व कर्मचा:यांना घटनास्थळी पाठवले. परंतु तेही उशिराने वाकोद येथे पोहोचले.
जिवंत असलेला मोर पुढील उपचारासाठी जामनेर येथे घेऊन गेले व मृत असलेल्या मोरांना घ्यायला येतो म्हणून निघून गेले. तोर्पयत तेथे पडलेल्या दोन मोरांचे शव तेथून गायब झाले.
तेथे केवळ मोराची पिसे पडलेली आढळली. अचानक या मोरांचा मृत्यू का झाला असावा, याची कारणे शोधणे गरजेचे असून, ज्या ठिकाणी मोर मृतावस्थेत पडलेले होते ते कुत्रे घेऊन गेल्याने त्या ठिकाणी फक्त मोराचे पीस आढळले. (वार्ताहर)
वाकोदसह परिसरात काही दिवसांपूर्वी असाच एक मोर बसस्थानक परिसरात काही लोकांनी जखमी अवस्थेत पाहिला होता. या मोरालादेखील वनविभागाशी बोलून युवकांनी जीवदान दिले होते. त्यानंतर ही दुसरी घटना घडली आहे.
वडाळी गावातील शेतामध्ये कामासाठी जात असताना या वेळी मला दोन मोर मृतावस्थेत, तर एक लाळ गाळत असताना दिसला. लागलीच काही युवकांना ही हकिकत सांगितली व या मोराला प्रथमोपचारासाठी वाकोद गावी पाठवले.
-गजानन पांढरे, शेतकरी, वडाळी