जळगावात दोन दुचाकींच्या अपघातात डंपरने दोघांना चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 12:56 PM2018-11-10T12:56:43+5:302018-11-10T12:57:08+5:30
आव्हाणे फाट्याजवळ अपघात
जळगाव : दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्यानंतर त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या डंपरने भरत काशिनाथ भालेराव (वय ३७) व विनोद दामू सोनवणे (वय ३४) दोन्ही रा.नांद्रा, ता.जळगाव या दोघांना चिरडल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता तालुक्यातील आव्हाणे फाट्याजवळ घडली. अमोल भरतसिंग पाटील (रा.कुसुंबा, ता.जळगाव) हा दुचाकीस्वार जखमी झाला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भरत भालेराव यांचा नांद्रा गावात सराफाचा व्यवसाय असल्याने दिवाळी पाडव्यानिमित्त ग्राहकाची आॅर्डर असल्याने ते विनोद सोनवणे यांना सोबत घेऊन दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.एफ.४१५४) शहरात दागिने घ्यायला येत असताना आव्हाणे फाट्याजवळ समोरुन अमोल भरतसिंग पाटील हे दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.एम.६२११) येत असताना दोघांच्या दुचाकी एकमेकावर धडकल्या. त्यात भरत व विनोद दुचाकीच्या खाली कोसळले व त्याचवेळी जळगाव शहराकडून आव्हाणेकडे येणाऱ्या भरधाव डंपरने (क्र.एम.एच.१९ झेड २२३०) भरत व विनोद या दोघांना चिरडले. त्यामुळे दोघंही जागेवरच गतप्राण झाले. दुसºया दुचाकीवरील अमोल पाटील हे देखील गंभीर जखमी झाले. अमोल यांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले तर मृत दोघांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.