रावेर तालुक्यात पुरामुळे दोन जणांचा मृत्यू, पुरात माजी उपनगराध्यक्ष बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2023 03:37 PM2023-07-06T15:37:36+5:302023-07-06T15:44:57+5:30
खिरोदा, रमजीपूर आणि शिंदखेडा या तीन गावातील ११ जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत.
रावेर (जि. जळगाव) : सातपुडा पर्वत रांगांमध्ये बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नागझिरी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात दोन जणांचा मृत्यू झाला. तर रावेरचे माजी उपनगराध्यक्ष हे पुरात बेपत्ता आहेत. हा प्रकार बुधवारी रात्री १२: ३० वाजता घडला.
बळीराम रायसिग बारेला (४५, रा. मोरव्हाल ता. रावेर) आणि शेख इकबाल शेख सत्तार कुरेशी (५८, रा. कुरेशी वाडा, रावेर) अशी पुरामुळे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. बळीराम बारेला हे मोरव्हाल गावातून शेताकडे जात असताना अचानक आलेल्या पुरात वाहून गेले. तर शेख इकबाल यांचे घर नदी किनारीच आहे. त्यांच्या घरात पुराचे पाणी घुसले. त्यात त्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
रावेरचे माजी उपनगराध्यक्ष सुधीर गोपाळ पाटील हे पुराच्या पाण्यात बेपत्ता आहेत. त्यांची मोटारसायकल नदीकिनारी आढळून आल्याची माहिती मिळाली. तर दुसरीकडे खिरोदा, रमजीपूर आणि शिंदखेडा या तीन गावातील ११ जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत.
रावेर तालुक्यातील सुकी (गारबर्डी) धरण बुधवारी रात्री १:३० वाजेच्या शंभर टक्के भरले आहे. तर भुसावळ नजीक असलेले हतनूर धरणाचे चार दरवाजे गुरुवारी सकाळी दहा वाजता उघडण्यात आले आहेत.
पाल येथे घरांमध्ये शिरले पाणी
मुसळधार पावसामुळे पाल ता. रावेर येथील नदीकाठी असलेल्या सत्तार तडवी यांच्या शेतातील कापूस व सोयाबीन पुरात वाहून गेले तर पाच ते सहा घरांमध्ये पाणी शिरले आहे.