पीडित श्वानाने धाडले दोघांना कारागृहात; कुत्र्याला फरफटत नेणाऱ्या दोघांना कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 15:40 IST2025-02-14T15:39:55+5:302025-02-14T15:40:09+5:30
जखमी श्वानासाठी कायदा जागला आणि न्याययंत्रणेच्या कोठडीत उभ्या दोघांना कारागृहात रवानगी झाली.

पीडित श्वानाने धाडले दोघांना कारागृहात; कुत्र्याला फरफटत नेणाऱ्या दोघांना कोठडी
जळगाव : मुक्या जिवाचा छळ केला म्हणून माणुसकी सरसावली. त्यासोबतच पीडित श्वानासाठी उपचार यंत्रणा धावली. एकीकडे जखमी श्वान 'माणूस'माया अनुभवत गेला आणि दुसरीकडे श्वानाचा छळ करणाऱ्यांना धडा शिकवायचा निश्चय झाला. जखमी श्वानासाठी कायदा जागला आणि न्याययंत्रणेच्या कोठडीत उभ्या दोघांना कारागृहात रवानगी झाली.
जळगाव शहरात कारच्या खिडकीबाहेर लटकवून एका श्वानाला फरफटत नेल्याचा अमानुष प्रकार नुकताच घडला होता. कारचालकासह अन्य एक सहकारी अनोळखी. म्हणून अॅड. केदार भुसारी यांनी रामानंद पोलिस स्टेशनला अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. अॅड. भुसारी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमी श्वानाला 'संरक्षणम्' या गोशाळेत दाखल केले. ही घटना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना कळाली. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांना उपचारासाठी सूचना केल्या. त्यानुसार गोशाळेत डॉ. मिलिंद पाटील, डॉ. प्रदीप चोपडे यांच्याकरवी जखमी श्वानावर उपचार सुरू झाले.
...अन् धडा शिकविला
अॅड. भुसारी रामानंदनगर पोलिसात गेले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना श्वानाच्या छळाविषयीचा व्हिडिओ पाठवला. जिल्हाधिकाऱ्यांनी डी. वाय.एस.पी. संदीप गावित यांच्याशी चर्चा करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. सोबतच भारतीय न्याय संहिता कलम ३२५ नुसार वाढीव कलम लावले.
याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून गौरव संदीप कापडणे (वय २५, रा. रुक्मिणीनगर, हरिविठ्ठल नगर) व संकेत वाल्मीक गांगुर्डे (वय २३, रा. म्युनिसिपल कॉलनी, रामानंदनगर) या दोघांची ओळख पटविली आणि दोघांना तत्काळ अटक करण्यात आली.
आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.