जळगावातील दुचाकीचोरीप्रकरणी खंडवा कारागृहातून दोघांना घेतले ताब्यात
By विलास बारी | Published: March 21, 2024 10:10 PM2024-03-21T22:10:46+5:302024-03-21T22:10:59+5:30
मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील पिपलोद पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन संशयित आरोपीना अटक करण्यात आली होती.
जळगाव: शहरातील एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत काही दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून दुचाकी चोरांना मध्यप्रदेशातील खंडवा येथील कारागृहातून ताब्यात घेत त्यांना अटक केली आहे.
मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील पिपलोद पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन संशयित आरोपीना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून स्थानिक पोलिसांना दुचाकी चोरीबाबत माहिती मिळाली होती. त्यात संशयित अनोप धनसिंग कोलम (कोरकू) (वय १८, रा. सुकवी थाना, खालवा, जि. खंडवा) व अंकित सुकलाल ठाकूर (वय २२, रा. अरविंद नगर, मुसाखेडी, इंदोर) यांना अटक केली होती. त्यांनी जळगावात एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले होते.
त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने खंडवा कारागृहातून दोघांना ताब्यात घेत अटक केली. दोन्ही संशयितांना एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतून १ लाख ८५ हजार रुपयांच्या ६ दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, अतुल वंजारी, गणेश सपकाळे, गफूर तडवी, सुनील सोनार, विकास सातदिवे, योगेश बारी, छगन तायडे यांनी ही कारवाई केली.