दुचाकीच्या डिक्कीतून पावणेचार लाख लांबविणाऱ्या दोघांची पोलिसांशी झटापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 02:45 PM2021-09-30T14:45:29+5:302021-09-30T14:46:15+5:30
अमळनेर पोलिसांकडून जळगावच्या दोन जणांना अटक
संजय पाटील
अमळनेर : धुळे शहरात दुचाकीच्या डिक्कीतून पावणे चार लाख रुपये लांबवणाऱ्या जळगावच्या दोघा सराईत गुन्हेगारांना अमळनेर पोलिसांनी झटापटीत पकडले. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस नाईक दीपक माळी व पोलीस नाईक रवींद्र पाटील हे २९ रोजी शहरात गस्त घालत होते. तेव्हा सायंकाळी सहाला त्यांना २१ रोजी धुळे येथील बांधकाम भवनच्या आवारातून मोटारसायकलच्या डिक्कीचे कुलूप तोडून त्यातून ३ लाख ८० हजार रुपये चोरणारे दोघे जण बसस्थानकावर असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. धुळे येथील घटनेचे सीसी टीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते.
पोलिसांना पैलाड भागात जळगाव येथील तांबापुरा कंजरवाडा खदानजवळील सराईत गुन्हेगार अजय बिरजू गारुंगे (वय ३०) व हितेश कृष्णा शिंदे (वय २१, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) हे दोघे मोटारसायकल (क्रमांक एमएच- १९-सीटी-५३१२) वर येत असताना दिसून आले. त्यांनी दोघांना अडवले असता त्यांनी पोलिसांना ढकलून खाली पाडले.
पोलिसांनी त्यांना ताबडतोब पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हुज्जत बाजी करून शर्टाची कॉलर पकडून ओढाताण केली यात पोलिसांचा खिसा फाटला. त्याच वेळी बसस्थानकावर कर्तव्यावर असलेले प्रमोद महाजन व ज्ञानेश्वर भोई हे मदतीला आले. दोघा आरोपीना पोलीस स्टेशनला आणून अटक केली.
अजयविरुद्ध अनेक गुन्हे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींकडे मोटारसायकलच्या डिक्कीचे लॉक तोडण्याची मास्टर की जप्त करण्यात आली. आरोपींकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी व्यक्त केली आहे.