गिरणा धरणातून शेतीसाठी दोन आवर्तन: कालवा सल्लागार समितीचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 10:46 PM2017-11-13T22:46:27+5:302017-11-13T22:50:05+5:30
बोरी व अंजनीला मार्च महिन्यात पाणी मिळणार
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१३ - कालवा सल्लागार समितीची बैठक सोमवारी दुपारी मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात पार पडली. त्यात जिल्हा प्रशासनाने गिरणा धरणातील सर्व उपलब्ध पाणीसाठा १०० टक्के पिण्यासाठी राखीव करण्याची शिफारस केलेली असताना शेतीसाठी गिरणातून दोन आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बोरी व अंजनीसाठी गिरणातून पाणी सोडण्याबाबत फेब्रुवारी महिन्यात पुन्हा बैठक घेऊन मार्च मध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीसाठी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार डॉ.सतीश पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार कुणाल पाटील, आमदार स्मिता वाघ, आमदार शेख, जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, गिरणा पाटबंधारे अधीक्षक अभियंता पाटीलआदीउपस्थितहोते.
गिरीश महाजन यांनी जिल्'ातील मध्यम प्रकल्पांच्या पाणी साठ्यासंदर्भात विचारणा केली. पाणी आरक्षण कसे आहे याबाबत मुंडके यांनी सांगितले की, प्रशासनाने अगोदर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे. मात्र गिरणा धरणाचे तीन आवर्तन रब्बी हंगामासाठी सोडावे, अशी मागणी आमदारांनी केली. परंतु पाण्याची मागणी पाहता ते शक्य नाही. एरंडोल व पारोळा तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून याबाबतही विचार व्हावा, अशी मागणी आ़मदार डॉ.सतीश पाटील यांनी केली. शेतीला पाणी द्यावे़ कारण यावर्षी खरीप हंगाम आला नाही़ रब्बी हंगामावर शेतकºयांची मदार असून शेतीला तर पाणी द्या; परंतु बोरी व अंजनी धरणात देखील पाणी सोडावे, अशी मागणी आमदार डॉ.सतीश पाटील यांनी केली. त्यावर मार्च महिन्यात पाणी सोडू, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. गुलाबराव पाटील यांनी तीन आवर्तन सोडावे, अशी मागणी केली.
शेतीसाठी ५ डिसेंबर व ५ जानेवारीला आवर्तन
या बैठकीत शेती उपयोगासाठी ५ डिसेंबर व ५ जानेवारी रोजी असे दोन आवर्तन देण्याचे ठरले. बोरीधरण तामसवाडी ता.पारोळा या धरणात ३६० द.ल.घ.फु. मृतसाठा शिल्लक आहे, हे पाणी दोन ते तीन महिने पारोळा शहर व परिसराला पाणी पुरवठ्यासाठी पुरेल, असे अधिकारी वर्गाकडून आकडेवरुन सांगण्यात आले. पुढे फेब्रुवारी महिनाअखेर परत कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन गिरणा धरणाचे शिल्लक पाणी व मृतसाठ्यातून बोरी धरणात व अंजनी मध्यम प्रकल्पात पाणी सोडण्याचे बैठकीत ठरणार आहे. तशी संमती या बैठकीत देण्यात आल्याची माहिती आमदार डॉ.सतीश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.