नामांतर प्रक्रिया : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला शासनाकडे पाठवावे लागणार दोन ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 01:08 PM2018-03-24T13:08:40+5:302018-03-24T13:08:40+5:30
महाराष्ट्र दिनापूर्वी परिपत्रक निघण्याची अपेक्षा
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २४ - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची घोषणा झाल्यानंतर आता विद्यापाठीला दोन ठराव करून शासनाकडे पाठवावे लागणार आहे. या ठरावानंतर शासकीय परिपत्रक निघून अधिकृतरित्या नाव दिले जाईल. ही प्रक्रिया झाली तर एका महिन्यातही पूर्ण होऊ शकते, त्यामुळे १ मे अर्थात महाराष्ट्र दिनापूर्वीच विद्यापीठाची नामकरण प्रक्रिया पूर्ण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची घोषणा २२ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली व संपूर्ण खान्देशात आनंदोत्सव साजरा झाला. नामकरणाची ही घोषणा झाली तरी यासाठी विद्यापीठस्तरावरून प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
२७ रोजी सिनेटच्या बैठकीत ठरावाची शक्यता
यामध्ये विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेची बैठक घेऊन पहिला ठराव करावा लागणार आहे. त्यानंतर दुसरा ठराव सिनेटचा करावा लागेल. यामध्ये योगायोगाने २७ रोजी सिनेटची अर्थसंकल्पीय बैठक असून यासाठी आता वेगळी बैठक बोलवावी लागणार नाही. याच बैठकीत हा ठराव होण्याची शक्यता आहे.
सिनेटपूर्वी व्यवस्थापन परिषदेचा ठराव करावा लागतो त्यामुळे २७ मार्च पूर्वी व्यवस्थापन परिषदेची बैठक बोलवावी लागणार आहे. विद्यापाठीकडून हे दोन्ही ठराव झाल्यानंतर ते शासनाकडे पाठविण्यात येतील. त्यानंतर परिपत्रक निघून कायद्यात रुपांतर होईल.
विद्यापीठाकडून दोन ठराव शासनाकडे पाठवावे लागतील, त्यानंतर कायदा होऊन नामांतर होईल.
- दिलीप रामू पाटील, सदस्य, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद.
विद्यापीठाच्या दोन्ही ठरावानंतर नामांतर होईल. ही प्रक्रिया महाराष्ट्र दिनापूर्वी व्हावी, अशी अपेक्षा आहे.
- अनिल राव, सदस्य, विद्यापीठ कायदा मसुदा समिती.