सातोड व जुनेपाणी सरपंच अपात्र; कुंझरसह 3 ग्रामपंचायतीतील ४ सदस्य अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2023 08:07 PM2023-03-08T20:07:42+5:302023-03-08T20:07:42+5:30
सातोड आणि जुनेपाणी येथील सरपंच असणाऱ्या दोघांना जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्य म्हणून अपात्र ठरविले आहे.
कुंदन पाटील
जळगाव: सातोड (मुक्ताईनगर) आणि जुनेपाणी (चाळीसगाव) येथील सरपंच असणाऱ्या दोघांना जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्य म्हणून अपात्र ठरविले आहे. तर अन्य ग्रा.पं.तील ४ सदस्यांवरही अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही सरपंच अपात्र सातोड (मुक्ताईनगर) येथील सरपंचपद ओबीसी संवर्गासाठी राखीव होते. या पदावर असणाऱ्या नयना श्रीधर पाटील यांनी पडताळणी केलेले जातप्रमाणपत्र सादर केले नसल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली होती. शेषराव काशिनाथ पाटील व योगेश दयाराम कोळी यांनी ही तक्रार दाखल केली होती. नयना यांनी जात दाखल्यासाठी मध्य प्रदेश प्रशासनाकडून प्राप्त केलेले दाखले सादर केले होते. जातपडताळणी विभागाचे प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना अपात्र ठरविले आहे.
जुनेपाणी पो.शिंदी ता.चाळीसगाव येथील अवलीबाई धर्मा राठोड यांनी अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना अपात्र ठरविले आहे.गोरख आप्पा राठोड या सदस्यालाही अपात्र ठरविले असून यासंदर्भात पंकज कैलास गरुड, ज्ञानेश्वर पिळोदे, नामदेव तिकोडे, दिलीप कोकणे, सरुबाई जाधव यांनी तक्रार केली होती.
कुंझरचे दोघे अपात्र
कुंझर (चाळीसगाव) ग्रा.पं.तील मनीषा संजय गढरी यांनी किरण ताराचंद मराठे, संगीता योगेश गढरी, सुमन मगनदास बैरागी, पूजा भूषण चौधरी यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार सुमन बैरागी यांच्या मुलाने आणि पूजा चौधरी यांच्या सासऱ्यांनी अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाल्याने दोघांना अपात्र ठरविण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आदेश पारित केले आहेत.