विधानसभेच्या दोन जागांचा युतीपुढे पेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 11:00 AM2019-02-20T11:00:55+5:302019-02-20T11:02:06+5:30
जळगाव, भुसावळ मतदार संघ सेनेचे, पण विद्यमान आमदार भाजपाचे
जळगाव : भाजपा- शिवसेनेत युती होऊन कोणी किती जागा लढवायच्या यावर शिक्कामोर्तब झाले, मात्र जिल्ह्यातील विधानसभेच्या ११ पैकी दोन जागांवरून पुन्हा ठिणगी पडण्याचेच संकेत आहेत. जळगाव, भुसावळ विधानसभा मतदार संघ हे पूर्वीच्या समिकरणानुसार शिवसेनेकडे होते, मात्र या मतदार संघातील विद्यमान आमदार हे भाजपाचे आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेत युती होणार नाही, असे म्हटले जात असताना सोमवारी युतीची घोषणा झाली. लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या हे देखील ठरले. त्यानंतर आता विधानसभा मतदार संघाचे नियोजन सुरू झाले आहे. दोन्ही पक्षांकडून आडाखे बांधले जात आहे. त्यामुळे पूर्वी शिवसेनेच्या वाटेचे दोन मतदार संघावर या पक्षाने दावा केल्यास या दोन मतदार संघांवरून पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
त्यात शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या जळगाव शहर व भुसावळ विधानसभा मतदार संघात भाजपाचे आमदार निवडून आले होते. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे चाळीसगावमधून उन्मेष पाटील, जामनेरमधून विद्यमान मंत्री गिरीश महाजन, मुक्ताईनगरमधून माजी मंत्री एकनाथराव खडसे, यावल-रावेरमधून हरिभाऊ जावळे, भुसावळ माजी मंत्री संजय सावकारे, जळगाव शहर सुरेश भोळे हे सहा जण विजयी झाले होते. एरंडोल मधून जि.प.चे माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांनी एरंडोल - पारोळा विधानसभा मतदार संघातून लढत दिली होती. शिवसेनेला २०१४ च्या निवडणुकीत चोपड्यातून प्रा. चंद्रकांत सोनवणे, पाचोरा किशोर पाटील, जळगाव ग्रामीणमधून विद्यमान राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदार संघ राखले होते.
असा होता २००९ चा फॉर्मूला
विधानसभेच २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपा शिवसेनेत युती होती. यात शिवसेनेने सहा तर भाजपाने पाच जागा लढविल्या होत्या. शिवसेनेने जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, पाचोरा, एरंडोल-पारोळा व चोपडा या सहा जागा लढविल्या होत्या. तर भाजपाच्या वाट्याला चाळीसगाव, जामनेर, मुक्ताईनगर, यावल-रावेर, अमळनेर हे पाच विधानसभा मतदार संघ आले होते. २०१४ मध्ये मात्र भाजपा-सेनेची युती नव्हती. त्यामुळे दोन्ही पक्षांनी प्रत्येक मतदार संघात उमेदवार दिला होता.
शिवसेनेचा दोन्ही ठिकाणी प्रभाव
४जळगाव शहर मतदार संघ व भुसावळ विधानसभा मतदार संघात प्रारंभापासून शिवसेनेचा प्रभाव असल्याचे लक्षात येते. २००९ मध्ये संजय सावकारे हे राष्टÑवादीच्या उमेदवारीवर विजयी झाले होते व २०१४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला व विजयी झाले होते. मात्र भुसावळ शहरात शिवसेनेचा प्रभाव चांगला राहीला आहे. या मतदार संघातून दोन वेळा सावकारे विजयी झाल्याने पक्ष या मतदार संघावरील दावा सहजासहजी सोडणार नाही. सावकारेंसाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे हे प्रयत्नशिल रहातील.
जळगाव सेनेचा पारंपरिक मतदार संघ
४ शहर मतदार संघात २०१४ ची निवडणूक लढविता शिवसेनेचा प्रभाव राहीला आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन हे काही काळ शिवसेनेत नसले तरी तब्बल विधानसभेच्या नऊ निवडणुकांमध्ये त्यांनी हा मतदार संघ आपल्याकडे राखला आहे. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाचे सुरेश भोळे हे विजयी झाले होते. मात्र पूर्वीपासून हा मतदार संघ शिवसेनेकडेच होता. शिवसेना आता या मतदार संघावरील दावा सोडणार नाही हे तेवढेच खरे. या मतदार संघातून पुन्हा माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी निवडणूक लढवावी असा या पक्षातील नेते मंडळींचा आग्रह सुरू आहे. त्यामुळे पारंपरिक मतदार संघ पुन्हा आपल्याकडे यावा, यासाठी शिवसेना आग्रही राहिल्यास जळगाव व भुसावळ मतदार संघांवरून पेच निर्माण होण्याचेच संकेत आहेत.