तरुणाच्या खून प्रकरणात दोघांना जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:30 PM2019-09-10T12:30:44+5:302019-09-10T12:31:29+5:30
१७ महिन्यापूर्वीची घटना : दारु कमी भरल्याचे कारण
जळगाव : मेहरुण शिवारातील शिवाजी उद्यानात सोनू गोरख साळुंखे (पाटील) (१९, रा.मिलिटरी कॉलनी, तांबापुरा) या तरुणाच्या खून प्रकरणात मोहन चंद्रकांत जाधव उर्फ प्यारे मोहन (१९) व गुड्डू उर्फ कनशा वहाब शेख खून (२२, रा.तांबापुरा) या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. न्या.पी.वाय.लाडेकर यांनी सोमवारी हा निकाल दिला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल २०१८ रोजी मयत सोनू गोरखसिंग साळुंखे, मच्छिंद्र तुकाराम नाथ( २३), मोहन जाधव(१९) व कानशा शेख( २२) हे चौघे जण शिरसोली नाकाजवळील हॉटेलवर मद्यप्रशान करण्यासाठी बसले होते. दरम्यान, सोनू याने गुड्डूच्या ग्लासात कमी दारु टाकली या कारणावरुन चौघांमध्ये वाद झाला होता.त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवाजी उद्यान परिसरात गुराख्याला झुडपांमध्ये सोनूचा मृतदेह आढळून आला होता.
११ साक्षीदारांची तपासणी
जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी युक्तीवाद करुन गोपाळ बाटुंगे, जयसिंग पाटील, जितेंद्र गायकवाड, डॉ. विजय कुरकुरे व तपासाधिकारी समाधान पाटील यांच्यासह ११ साक्षीदार तपासले. साक्ष व परिस्थिती जन्य पुरावे लक्षात घेत न्यायालयाने चंद्रकांत जाधव व कानशाशेख यांना जन्मठेप व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर मच्छिंद्र तुकाराम नाथ याची निर्दोष सुटका करण्यात आली.
‘लोकमत’ चा अंदाज ठरला होता तंतोतंत खरा
त्याच्या शरीरावर जखमा दिसत नसल्या तरी नाकातून व कानातून रक्त आलेले होते. घटनास्थळावर गोठलेले रक्त होते. त्याशिवाय दिवसा माणूस जावू शकत नाही अशा ठिकाणी त्याचा मृतदेह होता.त्यामुळे हा खून असल्याचा संशय ‘लोकमत’ ने व्यक्त केला होता, मात्र दारुच्या नशेतच त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त करुन अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदन अहवालात डोक्याला दुखापत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, शरद भालेराव, भरत लिंगायत व अशोक सनगत यांनी तपास करीत आरोपींनाच पोलिसात हजर केले होते. त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.