चोरट्यांचा अजबचं फंडा ! डल्ला मारल्यानंतर चोरट्यांनी दुकानही जाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 07:36 PM2020-07-18T19:36:42+5:302020-07-18T19:40:42+5:30
जळगाव : चोरी करण्याच्या नवीन पध्दती आजपर्यंत चोरट्यांनी वापरल्याचे पहावयास किंवा ऐकीवात असेल़ मात्र, चोरी केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी ...
जळगाव : चोरी करण्याच्या नवीन पध्दती आजपर्यंत चोरट्यांनी वापरल्याचे पहावयास किंवा ऐकीवात असेल़ मात्र, चोरी केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी थेट दुकानच जाळण्याचा अजब फंडा चोरट्यांकडून आता वापरला जात आहे. शहरात अशा दोन घटना उघडकीस आल्या आहेत़ कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नंदलाल जीवनराम राठी व पुखराज अर्जुन प्रजापत यांच्या दुकानातून चोरट्यांनी सुमारे १ लाख ६५ हजार रूपयांची रोकड लंपास केली. घटना शनिवारी सकाळी ६़३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे़ विशेष म्हणजे, चोरट्यांनी चोरी केल्यानंतर दोन्ही दुकाने पेटवून दिल्यामुळे सुमारे १ लाख ४० हजार रूपयांचे नुकसानही झाले आहे़ याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नंदलाल राठी हे कुटूंबीयांसह शाहुनगरात वास्तव्यास आहेत़ त्यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीत ५० क्रमांकाचे दुकान आहे़ या दुकानातून धान्य व बारदानाची विक्री केली जाते़ या कामासाठी त्यांना शालक प्रकाश डोडीया हे मदत करतात़ तसेच त्यांच्या दुकानाच्या रांगेतच पुखराज प्रजापत यांचेही बारदान विक्रीचे दुकान आहे़ शुक्रवारी सायंकाळी सात वाजता कामकाज आटोपल्यानंतर दुकानाला कुलूप लावून नंदलाल व त्यांचे शालक हे घरी निघून गेले़ दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ६़३० वाजता नंदलाल यांना राजेश प्रजापत यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की, तुमच्या दुकानाचे शर्टर अर्धवट उघडे असून दुकानातून धूर निघत आहे़ लागलीच त्यांनी ही बाब शालकाला सांगितली व दोघे दुकानाच्या ठिकाणी आले़
रोकड लंपास तर कागदपत्र, इतर साहित्य जळून खाक
राठी व डोडीया यांनी दुकानाची पाहणी केली असता, त्यांना चोरट्यांनी गल्लयातील पाच हजार रूपये चोरून नेल्याचे दिसून आले़ त्याचबरोबर दुकानाला आग लावल्याचे दिसले़ या आगीत जमा-खर्च वही, पास बुक, चेक बुक तसेच जंगम मालमत्तेची खरेदी-विक्री व्यवराहाराची संपूर्ण कागदपत्रे, जीएसटीची कागदपत्रे यासह इर्न्हरटर, ए़सी़ व इतर साहित्य असे सुमारे १ लाख रूपये किंमतीचे नुकसान झाल्याचे दिसून आले़
दुसºया दुकानातून लांबविली १ लाख ३५ हजारांची रोकड
चोरट्यांनी राठी यांच्या दुकानासोबतच जवळच असलेल्या पुखराज अर्जुन प्रजापत यांच्या दुकानामध्येही डल्ला मारून सुमारे १ लाख ३५ हजारांची रोकड लंपास केल्याचेही समोर आले़ त्याठिकाणी पाहणी केली असता चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेºयाची हार्डडिस्क तसेच डीव्हीआर, टीव्ही, नेट राऊटर असे २५ हजाराचा ऐवजही चोरून नेल्याचे आढळून आले़
खुर्ची, एसी जळून खाक
प्रजापत यांच्या दुकानातही चोरी केल्यानंतर चोरट्यांनी दुकान पेटवून दिले होते़ त्यात दुकानातील खुर्ची, ए़सी़तसेच फर्नीचर व इतर साहित्य जळून खाक झाले असून सुमारे चाळीस हजार रूपयांचे नुकसान झाले आहे़ दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीही याच प्रकारे शाहुनगरातील एका दुकानात चोरी करून पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली होती़
पोलिसात गुन्हा दाखल
बाजार समितीतील दोन दुकानांमध्ये चोरी करून पेटवून दिल्याची घटना उघडकीस आल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, मुद्दस्सर काझी, असीम तडवी यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली़ तसेच पोलिसांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासणीचे कामकाज सुरू आहे़ याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नंदलाल राठी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़