जिल्हाधिकारी कार्यालयातून पळविले वाळूचे दोन ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:13 AM2021-06-20T04:13:12+5:302021-06-20T04:13:12+5:30
गुन्हा दाखल : दंडाच्या रकमेचाही भरणा नाही जळगाव : महसूल पथकाने अवैध वाळू वाहतूक करताना पकडून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा ...
गुन्हा दाखल : दंडाच्या रकमेचाही भरणा नाही
जळगाव : महसूल पथकाने अवैध वाळू वाहतूक करताना पकडून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केलेले दोन ट्रॅक्टर तेथून चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शनिवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान, यापूर्वीदेखील जिल्हाधिकारी कार्यालय आवारातून वाळूचे जप्त ट्रॅक्टर व डंपर पळवून नेण्यात आल्याचे प्रकार घडलेले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मार्च रोजी मोहाडी व आमोदा येथील तलाठ्यांनी आव्हाणे रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर (एम.एच.२७ एल.८२४९) पकडले होते. हे ट्रॅक्टर जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आले होते. अधिकच्या चौकशीत हे ट्रॅक्टर विनोद दुर्योधन कोळी (रा.आव्हाणे, ता.जळगाव) याचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुन्हा ३१ मार्च रोजी आव्हाणे रस्त्यावर असोदा मंडळाधिकारी यांच्या पथकाने विनाक्रमांकाचे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर (चेसिस क्र.क्युडब्लूसीडी ४०६०६१२६३७९) पकडले होते. हे ट्रॅक्टरही पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले होते. विजय बाबुलाल तायडे (रा.वाल्मीकनगर) यांच्या मालकीचे हे ट्रॅक्टर असल्याचे निष्पन्न झाले होते. महसूल पथकाने या ट्रॅक्टरवर १ लाख १९ हजार ६४६ रुपयांचा दंड आकारला होता. दरम्यान, १७ जून रोजी तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केलेल्या ट्रॅक्टरची पाहणी केली असता दोघं ट्रॅक्टर गायब झाल्याचे निदर्शनास आले. ३१ मार्च ते १७ जून या कालावधीत ट्रॅक्टर पळविण्यात आल्याचा संशय आहे. याप्रकरणी महसूल सहाय्यक परवेश अहमद शेख (२८,रा.मानराज पार्क) यांनी शनिवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.