अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:25 PM2019-12-21T12:25:49+5:302019-12-21T12:26:19+5:30
सलग दुसऱ्या दिवशी कारवाई, एकूण तीन ट्रॅक्टर जप्त
जळगाव : जिल्ह्यात वाळू उपशास बंदी असली तरीही वाळू वाहतूक सुरूच असून शुक्रवारी पुन्हा दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. सलग दुसºया दिवशी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे दोन दिवसात एकूण तीन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात वाळू उपशास बंदी असून तीन दिवसांपूर्वी बांभोरी येथील वाळू गटही रद्द करण्यात आल्याने वाळू उपशास आळा बसणे अपेक्षित आहे. असे असले तरी राजरोसपणे वाळू वाहतूक सुरुच असल्याचे समोर येत आहे.
शुक्रवारी निमेखडी शिवारातील नदीपात्रातून वाळूची चोरी करताना दोन ट्रॅक्टर प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयाच्या पथकाने पकडले.
सकाळी सव्वा आठ वाजता मंडळाधिकारी योगेश नन्नवरे, प्रांताधिकारी कार्यालयाचे अतुल सानप हे निमखेडी शिवारात गस्त घालत असताना त्यांना दोन ट्रॅक्टर वाळूचा उपसा करून नेताना आढळून आहे. त्यात एमएच १९, पी.६७२१ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरसह एका विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरचा समावेश आहे. दोन्ही ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहेत.
गुरुवारीदेखील तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर सावखेडा शिवारात नदी पात्रामध्ये पकडले होते. ते ट्रॅक्टरदेखील जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले आहे.