वाळू उपसा करणारे दोन ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:12 PM2020-02-27T12:12:27+5:302020-02-27T12:12:52+5:30
माहिती मिळाल्याने इतर ठिकाणाहून ट्रॅक्टर पसार
जळगाव : जिल्ह्यात वाळूचे ठेके बंद असले तरी अवैध वाळू उपसा सुरूच असून निमखेडी येथील नदीपात्रातून वाळू उपसा करणारे दोन ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने जप्त केले. या ठिकाणाहून पाच-सहा ट्रॅक्टर चालक वाळू टाकून फरार झाले. दुसऱ्या एका कारवाई दरम्यान माहिती मिळाल्याने वाळू वाहतूकदार पसार झाले.
जिल्ह्यात वाळू गटांचे लिलाव झाले नसल्याने सर्वत्र नदीपात्रातील वाळूचा अवैधरीत्या उपसा वाळू माफिया करीत आहे. ते रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम व उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांचे एक असे दोन पथक विविध ठिकाणी रवाना केले. भारदे यांच्या पथकाने निमखेडी येथील नदीपात्रात जाऊन अवैधरीत्या वाळूचा उपसा करणाºया दोन ट्रॅक्टरवर कारवाई केली. मात्र पथकातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने पाच सहा ट्रॅक्टरचालक वाळू टाकून फरार झाले.
पथकाचा पाठलाग
वामन कदम यांचे पथक कारवाईसाठी निघाल्याचे कळताच त्यांच्या वाहनांचा वाळू माफियांच्या पंटरांनी पाठलाग सुरू केला. कदम यांचे वाहन मोहाडी रोडने जात असताना त्यांच्या मागेही वाळू माफियांचे पंटर होते. या पंटरांनी वाळूच्या ट्रॅक्टर चालकांना वाळू खाली करून परतण्यास सांगितले. यामुळे तेथे कारवाई होऊ शकली.
भारदे यांनी दोन ट्रॅक्टर तालुका पोलीस ठाण्यात जमा करून तलाठी, सर्कलला कारवाईचे आदेश दिले आहे.