दोन भामट्यांनी किराणा व्यापाऱ्यास लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 09:36 PM2021-05-13T21:36:22+5:302021-05-13T21:37:00+5:30
तांदूळवाडी, ता. भडगाव येथील व्यापारी किराणा माल घेण्यासाठी जात असताना एका व्यापाऱ्यास दिवसाढवळ्या दोन भामट्यांनी लुटल्याची घटना कजगाव चाळीसगाव मार्गावर गुरुवारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कजगाव, ता. भडगाव : येथून जवळच असलेल्या तांदूळवाडी, ता. भडगाव येथील व्यापारी किराणा माल घेण्यासाठी जात असताना या व्यापाऱ्यास दिवसाढवळ्या दोन भामट्यांनी लुटल्याची घटना कजगाव चाळीसगाव मार्गावर गुरुवारी सकाळी ९ वाजता घडली. एकाच दिवसापूर्वी चक्क तीन घर फोडत चार ते पाच लाखाच्या चोरीस काही तास उलटत नाही तोच दिवसाढवळ्या व्यापाऱ्यास लुटल्यामुळे मोठी घबराट पसरली आहे.
येथून जवळच असलेल्या तांदूळवाडी ता. भडगाव येथील किराणा व्यापारी रमेशचंद धाडीवाल हे नेहमीप्रमाणे सकाळी ९ वाजता आपल्या किराणा दुकानास लागणारा किराणा माल खरेदीसाठी आपल्या दुचाकीने कजगाव येथे जात असताना कजगाव-चाळीसगाव मार्गावर कजगावपासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर त्यांच्या मागाहून दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी या व्यापाऱ्यास थांबवत ‘कारे ऐकू येत नाही काय? मी तुला थांबण्यासाठी आवाज दिला, तू थांबला काय?’ अशी विचारणा केली.
कजगावात तपासणी सुरू आहे. तू कुठे चालला? कोरोना आहे कळत नाही काय? अशी भाषा वापरत धाडीवाल यांनी मी तांदूळवाडीचा किराणा दुकानदार असून, दुकानाचा माल खरेदीसाठी कजगाव जात असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी तुझ्याकडे जे आहे ते सर्व काढ आणि ते तुझ्या रुमालमध्ये टाक. पुढे कजगावमध्ये तपासणी सुरू आहे, असे सांगितल्याने घाबरलेल्या व्यापाऱ्याने आपल्याजवळ जे होतं, ते सारं काढले. याप्रमाणे खिशातील व थैलीमध्ये असलेले कागदपत्रे व रोख रक्कम घड्याळ व सोन्याची अंगठी काढली. नंतर या भामट्यांनी धाडीवाल यांच्या डोक्यावर बांधलेला रुमाल खोलायला लावत सारे पैसे, हातातील घड्याळ व अंगठी या रुमालात बांधताना हात चलाखी दाखवत पाच ते सात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी पसार केली.
काम फते केल्यानंतर तुमच्या रुमालामध्ये घड्याळ, अंगठी व नोटा बांधून थैलीत ठेवल्या आहेत. पुढे पोलिसांची तपासणी सुरू आहे. सांभाळून जा. कोरोना आहे, जास्त बाहेर फिरायचे नाही,असं म्हणत रमेशचंद धाडीवाल यांना पुढील मार्गी लावले, नि हे दोन भामटे चाळीसगावच्या दिशेने पसार झाले. दोनशे मीटर अंतरावर असलेला पेट्रोलपंप आला नि थैलीत रुमाल टाकला आहे किवा नाही, हे पाहण्यासाठी ते गेले असता, अंगठी गायब झाल्याचे लक्षात आले. पैसे पूर्ण होते किंवा नाही, हे घाबरलेल्या व्यापाऱ्यास लक्षात आले नाही. ही घटना भडगाव पोलीस स्टेशनला कळविण्यात आली.
तीन घरफोडी अन् काही तासात रस्तालूट
कजगावात एकाच रात्रीत तीन बंद घर फोडत चार ते पाच लाखांचा सोने-चांदी व रोकड चोरट्यांनी लांबविली होती. या घटनेस काही तास उलटत नाही तोच दिवसाढवळ्या मुख्य रस्त्यावर व्यापाऱ्यास लुटल्यामुळे नागरिकांत घबराट पसरली आहे. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुरळ घालणारे चोरटे सक्रिय तर नाहीत ना?
एका दिवसात तीन घरफोड्यांच्या तपासात पोलीस सक्रिय झाले असतानाच लागलीच रस्तालूट करत पोलिसांनाच आव्हान देत नागरिकांत घबराट निर्माण करत हे टोळके तर या भागात सक्रिय झाले नसतील ना, याचा पोलिसांनी तपास करावा, अशी मागणी होत आहे.