दोन आठवड्यात सोने ५०० रुपयांनी घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 12:01 PM2018-12-06T12:01:31+5:302018-12-06T12:03:15+5:30
पाच दिवसांपूर्वी गेले होते ३१ हजाराच्या खाली
जळगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव घसरल्याने तसेच डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयामध्ये सुधारणा होत असल्याने दोन आठवड्यात सोन्याचे भाव ५०० रुपये प्रती तोळ््याने घसरले आहेत. सुवर्णनगरी जळगावात ५ डिसेंबर रोजी सोन्याचे भाव ३१ हजार ३०० रुपये होते. ऐन खरेदीच्या हंगामात भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य या घटकांसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील विशेषत: अमेरिकेतील सोने- चांदीच्या भावातील चढ-उताराचा परिणाम भारतीय सुवर्ण बाजारावर होत असतो. त्यानुसार आताही आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव घसरल्याने सोन्याचे भाव गडगडले आहे. या सोबतच ७३ रुपयांवर गेलेले अमेरिकन डॉलरचे दर ७०.७२ रुपयांवर आल्याने सोन्यात घसरण होण्यास मदत होत आहे.
गेल्या महिन्यापासून घसरण सुरूच
गेल्या महिन्यात सोने ३२ हजारावर पोहचले होते. दिवाळीच्या काळात धनत्रयोदशीच्या मुहूर्तापासून सोने ३२ हजार ४०० रुपयांवर होते. मात्र अमेरिकेत सोन्याचे भाव कमी होताच ९ नोव्हेंबर, भाऊबीजेपासून कमी होत गेले. १० नोव्हेंबर रोजी सोने ३१ हजार ९०० रुपये प्रती तोळ््यावर येऊन सोने पुन्हा ३२ हजाराच्या खाली आले. तेव्हापासून घसरण सुरूच असून १२ नोव्हेंबरनंतर २०० रुपयांनी पुन्हा सोन्याचे भाव कमी होऊन ते १३ रोजी ३१ हजार ७०० रुपये प्रती तोळा झाले. त्यानंतर त्यात थोडी सुधारणा होऊन २१ नोव्हेंबर रोजी सोने ३१ हजार ८०० रुपयांवर पोहचले. त्यानंतर पुन्हा घसरण होऊन सोने २३ रोजी ३१ हजार ६००, २४ रोजी ३१ हजार ४०० रुपयांवर आले. २९ नोव्हेंबर रोजी तर ते ३१ हजार २०० रुपयांवर आले होेते.
३१ हजाराच्या खाली
मध्यंतरी तर एक दिवस म्हणजेच ३० नोव्हेंबर रोजी सोने ३० हजार ९०० रुपयांवर आले. मात्र त्यानंतर त्यात सुधारणा झाली व ते ५ नोव्हेंबर रोजी ३१ हजार ३०० रुपयांवर पोहचले. मात्र गेल्या दोन आठवड्याचा विचार केला तर २१ नोव्हेंबर नंतर घसरण होऊन ५ डिसेंबरपर्यंत सोने ५०० रुपये प्रती तोळ््याने कमी झाले व ते ३१ हजार ३०० रुपयांवर आले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव कमी झाल्याने व रुपयात सुधारणा झाल्याने सोन्याचे दर कमी झाले आहे.
- स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन.