दुचाकी चोरट्याला चोपड्यातून ठोकल्या बेड्या ! तीन दुचाकी हस्तगत ; एलसीबीची कारवाई
By सागर दुबे | Published: April 3, 2023 08:27 PM2023-04-03T20:27:01+5:302023-04-03T20:27:09+5:30
पुढील कार्यवाहीसाठी त्याला जळगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जळगाव: जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव, धरणगाव आणि भडगाव येथून दुचाकी लांबविणा-या दीपक सुमा-या बारेला (२७, रा.कर्जाणा, ता. चोपडा) याला चोपडा येथून बेड्या ठोकल्या असून त्याच्याजवळून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. पुढील कार्यवाहीसाठी त्याला जळगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
चोपडा तालुक्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे चोरट्यांचा शोध घेवून त्यांचा अटक करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी केल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाकडून दुचाकी चोरट्यांचा शोध सुरू होता. दीपक बारेला नामक व्यक्ती हा विना क्रमांकाची दुचाकी घेवून चोपडा शहरात फिरत असल्याची माहिती सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
चोपड्यातील कारगिल चौकात पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने पथकाला जळगाव, धरणगाव आणि भडगाव येथील तीन दुचाकी काढून दिल्या. ही कारवाई पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, अश्रफ शेख, दीपक पाटील, प्रवीण मांडोळे, परेश महाजन, हेमंत पाटील, प्रमोद ठाकूर आदींच्या पथकाने केली आहे.