जुगारअड्डयावरुन नेलेल्या दुचाकीची विक्री; संतापलेल्या चौघांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 12:29 PM2019-10-03T12:29:58+5:302019-10-03T12:30:25+5:30

मोरताळा तांडा येथे मारहाण, अपघात सांगून अनोळखी म्हणून केले रुग्णालयात दाखल

Two-wheeler sale Young man dies in beating of four | जुगारअड्डयावरुन नेलेल्या दुचाकीची विक्री; संतापलेल्या चौघांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

जुगारअड्डयावरुन नेलेल्या दुचाकीची विक्री; संतापलेल्या चौघांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Next

जळगाव : जुगारअड्डयावरुन मागून नेलेल्या दुचाकीची परस्पर विक्री केल्याच्या संतापात प्रमोद विलास पाटील (२३, रा.पळासदरे, ता.अमळनेर) या तरुणाला जुगारअड्डा व दुचाकी मालकासह चौघांनी बेदम मारहाण केली. नंतर बेशुध्दावस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या प्रमोदचा बुधवारी सकाळी साडे आठ वाजता मृत्यू झाला. हा खुनाचा प्रकार असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी दिवसभर तपासाचे सूत्र हलविले आणि सायंकाळपर्यंत चौघांना अटक केली.
पंकज नारायण सपकाळे (२७, रा.गेंदालाल मील, जळगाव) व सूरज विजय ओतारी उर्फ सुऱ्या (२६), अरुण उर्फ टिन्या भिमराव गोसावी (४३, दोन्ही रा. तुकारामवाडी) व गणेश सोमा नन्नवरे (४०, रा. पाळधी, ता.धरणगाव या चौघांना अटक करण्यात आली असून त्यांनी गुन्ह्याचीही कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंडाळे चौकात अरुण उर्फ टिन्या भिमराव गोसावी (४३, रा. तुकारामवाडी) याचा जुगारअड्डा आहे. हा जुगार अड्डा अधिकृत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या अड्डयावर प्रमोद पाटील हा तरुण अधूनमधून येत असल्याने त्याची मालक अरुण गोसावी याच्याशी ओळख झाली. त्यातून तो येथे कामे करायला लागला. आठ दिवसापूर्वी गावाला जायचे सांगून प्रमोद हा अरुण याची दुचाकी (क्र. एम.एच.१९ सी.एम.२२२१) घेऊन घरी गेला. वारंवार फोन करुनही प्रमोद दुचाकी आणत नसल्याने संतापलेल्या अरुण याने मंगळवारी पंकज सपकाळे, सूरज ओतारी व गणेश नन्नवरे यांना सोबत घेऊन अमोल साहेबराव पाटील याच्या मालकीची कार भाड्याने घेऊन प्रमोदचे गाव गाठले. मात्र तो घरी नसल्याने मोरताळा तांडा ता.धुळे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर हे चौघं जण तेथे पोहचले.
दुचाकी चोरीची आॅनलाईन तक्रार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद पाटील याच्यासोबत चौघांंपैकी एकाचा वाद झाला. या वादातून प्रमोद पाटील हा काही रोकड व दुचाकी घेवून पसार झाला होता. याबाबत जिल्हापेठ पोलिसात पंकज याने दुचाकी चोरीबाबत आॅनलाईन तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर पंकज, अरुण, सुरेश व गणेश असे चौघेही प्रमोदचा शोध घेत होते. संशयितांपैकी एकाने पोलीस कर्मचाºयाला प्रमोद दुचाकी घेवून गेल्याची माहिती दिली होती. त्यानुसार कर्मचाºयाने शोध घेतो, असे आश्वासन दिले होते. तसेच तुम्हाला तो मिळून आला तर कळवा, असे सांगितले होते, असे असताना बुधवारी त्याचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याची बातमीच धडकली.
रात्री नाही दिला जबाब
प्रमोद याला अनोळखी म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री ड्युटीला असलेले जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे दिलीप सोनार यांनी जखमीचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे नाव प्रमोद असल्याचे सांगत होता. प्रकृती गंभीर असल्याने त्याला बोलता येत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्याचा रात्री जबाब घेतला नाही.
पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर प्रमोदचे काका कैलास विनायक पाटील, पोलीस पाटील संजय बाबुराव पाटील व गावातील इतर नातेवाईक दुपारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. काका व पोलीस पाटील यांनी प्रमोदचा मृतदेह ओळखला.
त्यानंतर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक वाघमारे यांनी कागदपत्रांची पुर्तता करुन मृतदेह शवविच्छेदगृहात रवाना केला. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन झालेले नव्हते. प्रमोद याच्या पश्चात वडील विलास विनायक पाटील, आई कल्पना व विवाहित बहिण प्रतिभा असा परिवार आहे.
ती दुचाकी मिळालीच नाही
प्रमोद हा जी दुचाकी घेऊन गेला होता, त्या दुचाकीसाठी चौघं जण दुचाकी व प्रमोदच्या शोधासाठी गेले, तेथे त्यांनी प्रमोदला मारहाण केली, मात्र दुचाकी कुठे आहे, कोणाला विक्री केली किती रुपयाच विक्री केली हे स्पष्ट झालेले नाही.
दुचाकीची चोरी आणि ५० हजार चोरल्याचा आरोप
प्रमोद याने दुचाकीची चोरी केली व जाताना क्लबमधील ५० हजार रुपये चोरुन नेले होते, अशी माहिती अरुण याने जिल्हा पेठ पोलिसांना चौकशीत दिली.
या माहितीत किती तथ्य आहे, याची चौकशी पोलीस करीत आहेत. दरम्यान, प्रमोद पाटील याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, जिल्हा पेठ पोलिसांनी रात्री प्रमोदच्या वडिलांची फिर्याद घेतली. त्यानुसार तेथे खुनाचा गुन्हा दाखल करुन हा गुन्हा शून्य क्रमांकाने धुळे पोलिसांकडे वर्ग होणार आहे.
गावात आणि कारमध्ये मारहाण...
प्रमोद याला चौघांनी मोरताळा येथे बेदम मारहाण केली, त्यानंतर कारमध्ये बसवून पुढे आणले. तेथेही मारहाण झाली. यात तो गंभीर जखमी झाल्याने चौघं हादरले. त्यांनी तशाच स्थितीत त्याला जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात पहाटे २.४५ वाजता दाखल केले. रुग्णालयात आणताना दोघंच होते. याचा अपघात झाला आहे, त्याचे नाव, गाव माहिती नाही. आम्ही त्याला उचलून आणले असे सांगून दोघं जण तेथून निघून गेले. सकाळी ८.३० वाजता उपचार सुरु असताना प्रमोदचा मृत्यू झाला.
रुग्णालयात दाखल करताना दोघांना पाहिले; सकाळी मृत्यू झाल्याने फुटले खुनाचे बींग
प्रमोद याला पहाटे २.४५ वाजता दोघांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हा काही जणांनी संशयितांना पाहिले होते. सकाळी त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे विजयसिंग पाटील व सूरज पाटील यांना मिळाली. प्रमोद याचा टिन्याच्या क्लबवर वावर असल्याची व क्लबवरील काही जणांनी त्याला मारहाण केल्याची माहिती विजयसिंग पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी तपासाचे सूत्र फिरवून मृताची ओळख पटविली. पळासदरे येथील पोलीस पाटील संजय बाबुराव पाटील यांच्याशी संपर्क साधून त्याचा फोटो पाठविला.
ओळख पटल्यानंतर रुग्णालयात दाखल करणारे निष्पन्न केले. त्यातील पंकज याच्याशी विजयसिंग पाटील यांनी संपर्क साधून सुभाष चौकात बोलावले. प्रमोदने नेलेली दुचाकी चोरी झाल्याची माहिती व फोटो काही दिवसापासून सोशल मीडियावर फिरत असल्याने पाटील यांनी पंकज याच्याकडे विचारणा केली असता दुचाकी सापडली व प्रमोद दवाखान्यात दाखल असल्याचे सांगितले. प्रमोदचा मृत्यू झाल्याचे कोणालाही माहिती नव्हते, विजयसिंग पाटील यांनी ही माहिती त्याच्यापासूनही लपविली. पंकज याला दुचाकीवर बसवून थेट स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले नंतर सूरज ओतारी यालाही त्याच्या घरुन ताब्यात घेण्यात आले. तेथे चौकशीत प्रमोदला मारहाण केल्याची कबुली दोघांनी दिली. प्रमोदचा मृत्यू झाल्याचे सायंकाळी या दोघांना सांंगण्यात आले.
दुसरीकडे अरुण उर्फ टिन्या हा घरी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पेठचे निरीक्षक अकबर पटेल, गुन्हे शोध पथकाचे नाना तायडे, प्रशांत जाधव व अविनाश देवरे यांनी त्याला ताब्यात घेतले. दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, सहायक निरीक्षक स्वप्नील नाईक, विजय पाटील, नरेंद्र वारुळे, सुधाकर अंभोरे, दीपक शिंदे यांच्याही पथकाने संशयितांच्या मागावर होते. सायंकाळी गणेश नन्नवरेलाही अटक करण्यात आली. गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी पथकाचे कौतुक केले.

Web Title: Two-wheeler sale Young man dies in beating of four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव