रामलल्लांसह घरोघरी आल्या दुचाकी, चारचाकी
By विजय.सैतवाल | Published: January 22, 2024 05:38 PM2024-01-22T17:38:11+5:302024-01-22T17:38:49+5:30
श्रीराम प्राणप्रतिष्ठा मुहूर्तावर १२५ चारचाकी तर ५०० दुचाकींची विक्री.
विजयकुमार सैतवाल,जळगाव : आयोध्येत श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असताना या मुहूर्तावर श्रीराम भक्तांनी वाहन खरेदीचा मुहूर्त साधत चारचाकी, दुचाकी वाहनांची खरेदी केली. खास या दिवसासाठी अनेकांनी बुकिंग करून ठेवलेले वाहन घरी नेले. यामुळे सोमवार, २२ जानेवारी जळगावात १२५ चारचाकी व ५०० दुचाकींची विक्री झाली. या सोबतच मालवाहू वाहन, ट्रॅक्टरसाठीही मुहूर्त साधण्यात आला.
श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. यामुळे शहर भगवेमय होण्यासह या दिवसासाठी अनेक जणांनी वेगवेगळे नियोजन करून ठेवले होते. त्यात ज्यांना वाहन घ्यायचे आहे, अशा मंडळींनी २२ जानेवारी रोजी डिलिव्हरी घेण्याच्या दृष्टीने दुचाकी, चारचाकी वाहनांचे बुकिंग करून ठेवले होते. यात दुचाकी तर तत्काळ मिळणे शक्य होते, मात्र चारचाकींसाठी बुकिंग शिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे गेल्या एक-दोन महिन्यांपासून ग्राहकांनी तसे बुकिंग केलेले होते.
हवे ते ‘मॉडेल’ नाही, अन्यथा आणखी भर :
सोमवार, २२ जानेवारी रोजी जळगावातून १२५ चारचाकींची विक्री झाली. अगोदर बुकिंग केले असले तरी या तारखेला चारचाकीतील हवे ते मॉडेल उपलब्ध होत नसल्याने काहींची खरेदी लांबली. अन्यथा विक्री झालेल्या चारचाकींची संख्या आणखी वाढली असती, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.
२२ जानेवारी रोजी दुचाकी विक्रीची संख्या पाहिली तर ती ५००वर पोहचली. दुचाकीमध्ये अनेक कंपन्यांचे हवे ते मॉडेल उपलब्ध असल्याने ग्राहकांना सहज दुचाकी खरेदी करता आली. कार, दुचाकींसह लहान आकारातील मालवाहू वाहनेदेखील ग्राहकांनी खरेदी केले. या शिवाय ट्रॅक्टर खरेदीसाठीही ग्राहकांनी २२ जानेवारीचा मुहूर्त साधला.
सण-उत्सवाव्यतिरिक्त प्रथमच एवढी विक्री :
वाहन तसेच विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांचा विविध मुहूर्त साधण्यावर भर असतो. त्यामुळे गुढीपाडवा, अक्षयतृतीया, धनत्रयोदशी, दिवाळी पाडवा व इतर काही मुहूर्तांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. मात्र श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त २२ जानेवारी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनांची विक्री झाली.