सराफा दुकानातून दोन महिलांनी दीड लाखाची पोत लांबवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:21 AM2021-08-12T04:21:35+5:302021-08-12T04:21:35+5:30
रावेर : शहरातील महालक्ष्मी अलंकार ज्वेलर्स या दुकानात सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात महिलांनी ग्राहक बनून ...
रावेर : शहरातील महालक्ष्मी अलंकार ज्वेलर्स या दुकानात सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात महिलांनी ग्राहक बनून दीड लाखाची सोन्याची मंगलपोत पाहण्याच्या बहाण्याने लांबवली. या महिला सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाल्या असून दोन्ही अनोळखी महिलांविरुद्ध रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रावेर पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील चौराहा तथा डॉ. हेडगेवार चौकातील महालक्ष्मी अलंकार या सराफा दुकानात दोन अनोळखी महिला सोन्याची मंगलपोत खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या होत्या. त्यांनी हॉलमार्कच्या सोन्याचे मंगळसूत्र व काळे मणी असलेली मंगलपोत पाहत असतांना दुकानमालक नरेंद्र भगवान सोनार (४०, रा. राजू पाटील नगर, रावेर) यांची व त्यांच्या मुलाची नजर चुकवत ती लंपास केली. ३८.५०० ग्रॅम वजनाची व दीड लाख रुपये किमतीची ही पोत आहे. ही घटना ९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन ते पावणेचार वाजण्याच्या सुमारास घडली. पोत लांबवणार्या दोन्ही महिला सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाल्या आहेत. सराफा दुकानदार स्टॉक तपासून दुकान बंद करीत असतांना हा प्रकार लक्षात आला. सराफा दुकानाचे मालक नरेंद्र भगवान सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक हे पुढील तपास करीत आहेत.