पहूरला आढळले दोन वर्षांचे बेवारस बालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 08:46 PM2019-10-12T20:46:09+5:302019-10-12T20:46:55+5:30
सोशल मीडियामुळे पटली ओळख । आज्ञात युवकाच्या हाती सोपवून रेल्वे पोलिसांनी झटकली जबाबदारी
पहूर, ता.जामनेर : गोपनीय माहितीच्या आधारे शिवनगर भागातून एका युवकाच्या ताब्यातून अज्ञात दोन वषाचे बाळ पोलिसांना आढळले. दोन दिवसांपूर्वी शहनिशा न करता पाचोरा रेल्वे पोलिसांनी या युवकाच्या ताब्यात हे बालक सोपावून आपल्यावरची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचे शनिवारी पहूर पोलिसांनी केलेल्या चौकशीतून निष्पन्न झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ रा.ऐनगाव, ता.बोदवड, हल्ली मुक्काम पहूर शिवनगर भागातील रहिवासी मारुती गोविंदा आंबोरे हा युवक मुंबईहून रेल्वेने पाचोरा रेल्वे स्थानकावर गुरवारी पहाटे उतरला. प्लॅटफार्मवर एका ठिकाणी विश्रांतीसाठी झोपला. यावेळी त्याच्या बाजूला एक जोडपे बसलेले होते. काही वेळात हे जोडपे तिथून निघून गेले. मात्र हे दोन वर्षाचे बालक तिथेच राहिले.
रेल्वे पोलिसांचा चुकीचा सल्ला
गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी या बाळाची जराही चौकशी न करता झोपलेल्या मारुती आंबोरे या युवकाजवळ बाळ देऊन त्यास घेऊन जाण्याचा सल्ला दिला. स्वत:वरील जबाबदारी झटकून पोलीस मोकळे झाले.
बाळाची आई येणार पहूर पोलिसांकडे
सबंधीत बाळाची आई ठाणे येथील रहिवासी असून नवी मुंबईतील तुर्भे रेल्वेस्थानकावरून बाळ गायब होऊन रेल्वेने बाळ पाचो-यापर्यंत आल्यावर टी.सी.ने पाचोरा रेल्वे स्थानकावर बाळाला सोडले. त्यानंतर पाचारो रेल्वे पोलिसांनी ही जबाबदारी मारुतीच्या अंगावर टाकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सोशल माध्यमावर पहूर पोलिसांनी बाळाचा फोटो व्हायरल केल्याने बाळाची ओळख पटली असून त्याची आई पहूर पोलिसांकडे येणार आहे.