जळगावात दोन वर्षाच्या चिमुकल्याचा कोरोनामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:11 AM2021-03-29T04:11:11+5:302021-03-29T04:11:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अगदीच गंभीर प्रकार समोर येत असून एका दोन वर्षीय व गंभीरावस्थेत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अगदीच गंभीर प्रकार समोर येत असून एका दोन वर्षीय व गंभीरावस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल अमळनेर येथील बालकाचा मृत्यू झाला. शासकीय अहवालात ही नोंद करण्यात आली असून शासकीय यंत्रणेने याची पुष्टी केली आहे.
अमळनेर तालुक्यातील या बाळाला गेल्या आठ दिवसांपासून न्यूमोनियाची लागण झाली होती. त्याचा पहिला कोरोना अहवाल निगेटीव्ह आला होता. दरम्यान, अशा अवस्थेत या बाळाला पालकांनी दोन खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, अखेर गंभीरावस्था झाल्याने त्यांनीही नकार दिला होता. त्यानंतर २६ मार्च रोजी गंभीरावस्थेत या बालकाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी व्हेंटीलेटर लावून डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र, त्यानंतर अगदी २४ तासाच्या आत या बाळाचा मृत्यू झाला. रविवारी पित्याची लेखी घेऊन या बाळाचा मृतदेह देण्यात आला.
बालकेही होताय गंभीर
पहिल्या लाटेत लहान मुले नवजात शिशू कोरोनापासून बचावले होते. सुदैवाने १ ते १४ वर्षापर्यंत एकही मृत्यू नव्हता. मात्र, यंदाच्या या लाटेत बालकांनाही गंभीर लक्षणे समोर येत आहेत. अनेक नवजात शिशूंना ऑक्सिजन लावावे लागत आहे. त्यामुळे बाळांना, लहान मुलांना कोरोना होणार नाही या गैरसमाजात न रहाता लक्षणे दिसल्यास तातडीने त्यांची तपासणी करून घ्यावी, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
१४ मृत्यू ११९४ रुग्ण
जिल्ह्यात रविवारी १४ मृत्यू व ११९४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मृतांमध्ये पुन्हा काही कमी वयाच्या रुग्णांचा समावेश आहे. यात शहरात सर्वाधिक २८४ तर चोपडा तालुक्यात २९४ रुग्ण आढळून आले आहेत.