चाकू हल्ला प्रकरणात दोघा भावांना २ वर्षाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 10:09 PM2019-05-17T22:09:13+5:302019-05-17T22:11:36+5:30
निकाल : २५ हजार रूपयांचा ठोठावला दंड
जळगाव- दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्याचा राग येऊन संतोष भगवान पाटील (रा़ बालाजी पेठ) यांच्यावर चाकू हल्ला झाला होता. याप्रकरणात आरोपी मनोज उर्फ मन्या रामचंद्र सपकाळे व राहुल उर्फ बबलू रामचंद्र सपकाळे (रा.शनिपेठ) या सख्या भावांना शुक्रवारी न्यायालयाने दोषी धरून २ वर्ष सश्रम कारावासाच्या शिक्षेसह २५ हजार रूपयांचा दंड प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी़ए़सानप यांनी ठोठावला.
बालाजी पेठेतील संतोष पाटीले हे २ जानेवारी २०१४ रोजी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास दुध फेडरेशनमार्गे पाळधी येथील मंदिरात दर्शनासाठी जात होते. त्यावेळी मनोज सपकाळे व राहुल सपकाळे दोघे भाऊ दुचाकीवरून जात असताना त्यांनी संतोष पाटील यांना कट मारला. पाटील यांनी लागलीच दोघांना दुचाकी सावकाश चालवा असे सांगितले़ याचा राग येऊन दोघांनी त्यांना मारहाण छातीवर आणि पोटावर चाकूने वार केले. हा प्रकार रस्त्यातील ये-जा करणाऱ्यांनी पाहताच त्यांनी दोघांच्या हातातून पाटील यांची सुटका केली होती़. नंतर त्यांच्या फिर्यादीवरून दोन्ही भावांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सात साक्षीदार तपासले
दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर खटला हा न्यायालयात सुरू झाला. यात सरकारपक्षातर्फे अॅड. नीलेश चौधरी यांनी ७ साक्षीदार तपासले़ त्यामध्ये वैद्यकी अधिकारी डॉ़ राहुल निकम, फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी व तपासी अधिकारी सार्थक नेहते यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या़ विशेष बाब म्हणजे गुन्ह्यातील हत्यार हे जप्त करण्यात आलेले नव्हते़ मात्र, अॅड. नीलेश चौधरी यांनी गुन्हा सिद्धीसाठी हत्याराची आवश्यकता नसल्याबाबतचा जोरदार युक्तीवाद केला. हा युक्तीवाद न्यायाधीश जी.ए.सानप यांनी ग्राह्य धरून मनोज आणि राहूल या दोघांना दोषी ठरविले. नंतर शुक्रवारी न्या़ सानप यांनी मनोज सपकाळे आणि राहुल सपकाळे या भावांना २ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा व २५ हजार रूपयांची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड.नीलेश चौधरी यांनी तर बचाव पक्षातर्फे अॅड. डी़.जे़.पाटील यांनी कामकाज पाहिले.