दोन वर्षांनंतरही ४३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 11:37 AM2019-06-07T11:37:38+5:302019-06-07T11:38:15+5:30
शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली थट्टा
जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणजेच कर्जमाफी योजनेच्या सातत्याने बदललेल्या निकषांमुळे शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा घोळ तब्बल दोन वर्ष होऊनही सुरूच आहे. अद्यापही ४३ हजार ११६ शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीची १८६ कोटी ७३ लाख १८हजार ६६७ रूपये एवढी रक्कम वर्ग होणे बाकी आहे. यामुळे सरसकट कर्जमाफीचा नवा घोळ सुरू झाला आहे. यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून (डीडीआर) माहिती मागविली आहे.
सतत चार वर्षांच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडून थकबाकीदार झालेल्या शेतकºयांना पीककर्जही मिळणे अशक्य झाले. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने २८ जून २०१७ रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ या नावाने कर्जमाफी योजनेची घोषणा केली.
आता सरसकट शेतकरी कर्जमाफीचा घोळ
शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली बदलत्या अटींमुळे घोळ घातला गेला. तो अजूनही मिटलेला नाही. आता सरसकट शेतकरी कर्जमाफी करण्याची तयारी शासनाने चालविली असून त्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून माहिती मागविण्यात आली आहे. आधीची शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना फसल्याने अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. तर अनेकांना कर्जमाफी मिळूनही थकबाकीदार राहिल्याने त्यांना पिककर्जही मिळू शकलेले नाही. त्यातच आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने ३० जून २०१८ पर्यंत थकबाकीदार शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
शेतकºयांची समस्या कायमच
शेतकºयांना कर्जमाफी दिली तरीही बँकांकडून पीककर्ज देण्यास मात्र हात आखडता घेण्यात आला. कर्जमाफीचे सुमारे ६०० कोटी जिल्हा बँकेला मिळूनही बँकेने मात्र कर्जमाफी झालेल्या शेतकºयांना ५० टक्केच पीककर्ज देण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याची अंमलबजावणीही केलीे. त्यातच शासन पुन्हा कर्जमाफी करणार अशी चर्चा सुरू होताच उर्वरीत शेतकºयांनीही कर्जफेड थांबविल्याने जिल्हा बँकेची वसुली ठप्प झाली आहे.
अद्यापही ४३ हजार शेतकरी वंचित
कर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदान व ओटीएस अशा तीन वर्गवारीत ही कर्जमाफीची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात जिल्ह्यातील २ लाख ४३ हजार ४४२ शेतकरी पात्र ठरले. त्यांची ९६६ कोटी ४० लाख ६१ हजार ९९९ रूपये इतकी रक्कम कर्जमाफीसाठी पात्र ठरली. मात्र या प्रक्रियेत आतापर्यंत २ लाख २७६ शेतकºयांच्या खात्यावर ७७९ कोटी ६७ लाख ४३ हजार ३३२ रूपये इतकी रक्कम वर्ग करण्यात आली आहे.