एकास गंभीर जखमी करणाऱ्या दोघांना तीन वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:52 AM2019-01-23T00:52:15+5:302019-01-23T00:56:59+5:30
चोपडा तालुक्यातील मितावली येथील जुन्या उसनवारी पैसे देण्याघेण्याच्या वादातून एकास गंभीर जखमी केल्याप्रकरणी चोपडा न्यायालयाने दोघांना दोषी धरत तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
चोपडा : तालुक्यातील मितावली येथील जुन्या उसनवारी पैसे देण्याघेण्याच्या वादातून एकास गंभीर जखमी केल्याप्रकरणी चोपडा न्यायालयाने दोघांना दोषी धरत तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
न्यायालयीन सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, १० जानेवारी १७ रोजी अरविंद अशोक पाटील रा. मितावली हा अडावद बस स्थानकावर जात असतांना योगीराज गोरख पाटील व दुर्गादास बद्रीनाथ पाटील यांना उसनवार दिलेले पैसे मागितले असता त्याचा राग आल्याने दोघांनी अरविंद याच्या डोक्यात लोखंडी पट्टी मारून गंभीर जखमी केले. याबाबत अडावद पोलीस स्टेशनला अरविंदचे वडील अशोक नामदेव पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याचा तपास रवींद्र सोनार यांनी करून दोघा आरोपींवर दोषारोप पत्र चोपडा न्यायालयात दाखल केले होेते. न्यायालयाने सहा साक्षीदार तपासून त्यांची साक्ष ग्राह्य धरीत न्या. ग. दि. लांडबले यांनी दोघा आरोपींना दोषी धरीत भादंवि कलम ३२६ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून बी. जी. खिल्लारे यांनी काम पाहिले. पो.कॉ. रमेश माळी यांनी त्यांना मदत केली.