ट्रॉलाच्या धडकेत उपवरासह चहार्डीचे दोघे जागीच ठार, चोपडा शिरपूर रस्त्यावर अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 12:18 PM2018-05-07T12:18:02+5:302018-05-07T12:18:02+5:30
ट्रॉला चालक फरार
आॅनलाइन लोकमत
चोपडा, जि. जळगाव, दि. ७ - कामावरून दुचाकीने घरी परतत असताना ट्रालाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील सागर कैलास शर्मा (२४), दीपक कैलास महाजन (२१) हे तरुण जागीच ठार झाले. अपघातानंतर ट्रॉला चालक ट्रॉला जागेवर सोडून फरार झाला. सागरचे २९ जून रोजी जळगाव येथील मुलीशी विवाह होणार होता. दोन्ही तरुण प्रमुख शिरपूर येथे कामाला होते.
सागर व दीपक हे दोघे तरुण शिरपूर येथील टेक्सटाईल मधून कामावरून सोमवारी सकाळी चहार्डी येथे दुचाकीने गावाकडे येत असताना चोपडा शिरपूर रस्त्यावर हातेड बुद्रुक येथील वीज वितरण कंपनी कार्यालयाजवळ सकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास चोपड्याकडून शिरपूर कडे जाणारा ट्रॉलाने धडक दिली. त्यात दीपक महाजनच्या डोक्याची कवटी पूर्णपणे फुटली तर सागर शर्माचा चेहऱ्याची हाडांचा चुराडा झाला. सागर हा चहार्डी आणि परिसरात पुजारीचे काम करणारे कैलास शर्मा यांचा मोठा मुलगा होता. त्याचा विवाह जळगाव येथील मुलीशी २९ जून रोजी जळगाव येथे होणार होता. सागर शर्माच्या पश्चात आई वडील, एक भाऊ, काका असा परिवार आहे. विवाहपूर्वीच काळाने त्याच्यावर झडप घातली आणि दीपक महाजन हा कैलास महाजन यांच्या एकुलता एक मुलगा होता. दीपक महाजनच्या पच्यात आई वडील, आजी, आजोबा, दोन बहिणी असा परिवार आहे.
दोघांची एकाच वेळी निघणार अंत्ययात्रा
दरम्यान दोन्ही ठार झालेले तरुण एकाच गल्लीतील रहिवासी असल्याने ७ रोजी सायंकाळी ५.०० वाजता त्यांची एकत्र अंत्ययात्रा निघणार आहे. या घटनेने चहार्डीसह चोपडा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे तर चहार्डीवर शोककळा पसरली आहे.