अमळनेर येथील दोघे तरुण अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 04:00 PM2020-06-15T16:00:16+5:302020-06-15T16:00:53+5:30
एक गंभीर : जळगाव चोंडी गावाजवळील दुर्घटना
अमळनेर : शिर्डीहून मोटरसायकलने परतताना ट्रकने धडक दिल्याने शहरातील झामी चौक व बालाजीपुरा भागातील तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना १५ रोजी पहाटे १ वाजता मालेगाव - पुणे रोडवर जळगाव चोंडी गावाजवळ घडली. या अपघातात अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेबाबत गावात हळहळ व्यक्त होत आहे.
झामी चौकातील विकास जगन्नाथ ईशी (वय २९) व, बालाजी पुरा भागातील साईबाबा मंदिराजवळील गणेश चौधरी (वय ३२) तसेच प्रीतम गुलाब ठाकूर (वय ३०) , चंद्रकांत पाटील हे चार जण १४ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारस प्रीतमचा भाऊ हर्षल ठाकूर याला घ्यायला मोटरसायकलने शिर्डी जाण्यास निघाले. हर्षल मोटरसायकलने पुण्याला गेलेला होता. तो मोटरसायकलने शिर्डी पर्यंत आला होता. रात्री शिर्डीहून परतताना विकासला गाडी चालवता येत नव्हती. म्हणून प्रीतमने गाडी चालवायला घेतली व गणेश त्याला मागून धरून बसला. तिघे एकाच मोटरसायकलने परत यायला निघाले होत.े तर चंद्रकांत आणि हर्षल दोन्ही वेगवेगळ्या मोटरसायकलने पुढे निघाले होते. मालेगाव जवळील जळगाव चोंडी गावाजवळ एका ट्रकने धडक दिल्याने एकाच मोटरसायकलवर असलेले विकास , गणेश , प्रीतम खाली कोसळले त्यात विकास जागीच ठार झाला . गणेश व प्रीतमला मालेगाव ला खाजगी दवाखाण्यात दाखल केले असता गणेशचा देखील मृत्यू झाला. प्रीतम गंभीर जखमी आहे. त्याचा पाय फ्रँक्चर झाला आहे.