संभाषणातून भुरळ घालत कारद्वारे अपहरण केलेले दोन्ही युवक इगतपुरी रेल्वे स्थानकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 10:14 PM2020-12-26T22:14:43+5:302020-12-26T22:18:27+5:30

शिक्षणासाठी ये- जा करणार्‍या दोन युवकांना छोरीया मार्केटच्या परिसरात कारने आलेल्या अज्ञात इसमांनी कुणाचा तरी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने संभाषणातून  भुरळ घालत चारचाकी गाडीत बसवून नेले.

The two youths were abducted by a car at Igatpuri railway station | संभाषणातून भुरळ घालत कारद्वारे अपहरण केलेले दोन्ही युवक इगतपुरी रेल्वे स्थानकावर

संभाषणातून भुरळ घालत कारद्वारे अपहरण केलेले दोन्ही युवक इगतपुरी रेल्वे स्थानकावर

Next
ठळक मुद्देरावेर शहरासह ग्रामीण भागात खळबळ.इगतपुरी पोलीसांनी दिली सुखरूप ताब्यात.

रावेर : तालुक्यातील पाडळे बु ।। व पातोंडी येथील कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वीच्या शिक्षणासाठी ये- जा करणार्‍या दोन युवकांना छोरीया मार्केटच्या परिसरात कारने आलेल्या अज्ञात इसमांनी कुणाचा तरी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने संभाषणातून  भुरळ घालत चारचाकी गाडीत बसवून नेले. हे अपह्रत दोन्ही युवक शुध्दीवर येताच रेल्वेमधून इगतपुरी स्थानकावर उतरून त्यांनी बंदोबस्तावर असलेल्या रेल्वे पोलिसांशी संपर्क साधल्याने पोलीसांनी दुसर्‍या दिवशी त्यांची ओळख पटवून पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेने शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, तालुक्यातील पाडळे बु ।। व पातोंडी गावातील दोन युवक येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत शिकत असल्याने एक दिवसाआड सुरू असलेल्या तासिकांसाठी गुरूवारी सकाळी शहरात दाखल झाले. काही खासगी कामानिमित्त ते दोघंही मित्र शहरातील छोरीया मार्केट परिसरात पायी फिरत असताना चारचाकी कारमधून आलेल्या अज्ञात इसमांनी त्यांना कुणाचा तरी पत्ता विचारला. तेवढ्याचं संभाषणातून त्यांना भुरळ पडल्याने चारचाकी कारमधून गेलेले ही दोन्ही १७ ते १८ वर्ष वयोगटातील मुले थेट रेल्वेमधून इगतपुरी रेल्वे स्थानकावर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पोहचल्यानंतर भानावर आले. स्मृतिभ्रंश झालेल्या या दोन्ही मित्रांना आपण चारचाकी कारमध्ये बसवल्यानंतर रेल्वे एक्स्प्रेसने इगतपुरी रेल्वे स्थानकावर कशी पोहचत आहोत? याचा धक्का बसल्याने त्यांनी मध्य रेल्वेच्या इगतपुरी स्थानकातील रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. 

दरम्यान, दररोज दुपारी तीन वाजेपर्यंत पोहचणारी मुलं सायंकाळी घरी न पोहचल्याने पालक इकडे कासावीस झाले. पालकांनी त्यांच्या मित्रांकडे व नातलगांकडे चौकशी केली असता कुणीही काहीही माहिती देत नसल्याने पालक चिंतातूर झाले होते. त्या दरम्यान इगतपुरी रेल्वे पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्याकडून पालकांचे भ्रमणध्वनी क्रमांक प्राप्त करीत संपर्क साधल्याने संबंधित पालकांचा जीव भांड्यात पडला. संबंधित युवकांच्या पालकांनी मुंबईस्थित असलेल्या आपल्या आप्तेष्टांना कळवून इगतपुरी रेल्वे पोलिसांत रवाना केले होते. इगतपुरी पोलीसांनी रात्री दोन्ही युवकांची भोजन व झोपण्याची व्यवस्था करून त्यांना धीर दिला.

 शुक्रवारी सकाळी दोन्ही मित्र असलेल्या युवकांचे मुंबईतील आप्तेष्ट त्यांना ताब्यात घेण्यासाठी धडकले असता प्रथमदर्शनी पोलीसांनी त्यांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. मात्र, संबंधित आप्तेष्टांनी युवकांच्या पालकांशी व्हिडिओ कॉलवर त्यांची व मुलांचीही ओळख पटवून दिल्याने, त्यांचे लेखी जबाब नोंदवून दोन्ही अपह्रत मुलांना त्यांच्या ताब्यात देवून सुटका केली. 

घरून स्वतंत्र वाहनाने गेलेल्या पालकांनी त्यांच्या आप्तेष्टांकडून नाशिक येथून दोन्ही मुलांना ताब्यात घेऊन सुटकेचा नि:श्वास सोडल्याची घटना घडली. या घटनेने शहरासह ग्रामीण भागातील शैक्षणिक वर्तुळात व शिक्षक, पालक व विद्यार्थीवर्गात कमालीची खळबळ उडाली असून दहशत निर्माण झाली आहे. तत्संबंधी रावेर पोलीसात मात्र कुठलीही नोंद नसल्याचे सुत्रांनी सांगितले. 
 

Web Title: The two youths were abducted by a car at Igatpuri railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.