उद्धव ठाकरेंच्या सभेपुर्वीच जिल्ह्याचे राजकारण तापले, सभेत घुसण्याच्या इशाऱ्यावरुन गुलाबराव पाटलांचा युटर्न
By Ajay.patil | Published: April 21, 2023 06:25 PM2023-04-21T18:25:34+5:302023-04-21T18:26:35+5:30
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन रविवारी पाचोरा येथे करण्यात आले आहे.
जळगाव - शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन रविवारी पाचोरा येथे करण्यात आले आहे. मात्र, ठाकरे यांच्या सभेच्या आधीच जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. या सभेत खासदार संजय राऊत यांनी चौकटीत बोलावे अन्यथा मी त्यांच्या सभेत घुसेल असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्यानंतर, पालकमंत्र्यांवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
त्यामुळे रविवारी होणाऱ्या सभेच्या आधी शिवसेना शिंदे विरुध्द शिवसेना ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तासंघर्ष व शिवसेनेतील फुटीनंतर जळगाव जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची पहिलीच सभा होत आहे. तर यानिमित्त शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे देखील जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यातच शिवसेनेतील फुटीमध्ये जळगाव जिल्ह्यातील पाच आमदारांचा समावेश आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या सभेला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.
पालकमंत्र्यांच्या इशाऱ्यावर ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर
१. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी उद्धव ठाकरे यांच्या सभेबाबत विचारले असता, त्यांनी या सभेत संजय राऊत जर चौकटीत बोलले नाहीत तर थेट सभेत घुसण्याचा इशारा दिला होता. पालकमंत्र्यांच्या या इशाऱ्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.
२. खासदार संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांनी सभेत येवून परत जावून दाखवावे असा इशारा दिला. त्यांच्यासह ठाकरे गटाचे जिल्हा सरचिटणीस गजानन मालपुरे यांनी ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सभेत घुसल्यास ५१ हजार रुपयांचे पारितोषीक जाहीर केले.
३. युवासेनेचे शरद कोळी यांनीही गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करत, आम्ही कसं बोलायचं हे पालकमंत्र्यांनी आम्हाला शिकवू नये. त्यांनी जर इशारा दिला असेल तर तो इशारा त्यांनी खरा करून दाखवावा असे थेट आव्हान शरद कोळी यांनी पालकमंत्र्यांना दिले आहे.
राऊत-गुलाबराव पाटलांच्या वादात खडसेंचे इंट्री..
खासदार संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या पाचोऱ्यात होणाऱ्या सभेच्या नियोजनासाठी जिल्ह्यात येत आहेत. गुलाबराव पाटील यांनी राऊतांना दिलेल्या इशाऱ्यावरून आता एकनाथ खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सल्ला दिला आहे. गुलाबराव पाटील हे स्वत: कधी चौकटीत बोलले आहेत ?, ते स्वत: चौकटीबाहेरच बोलतात आणि संजय राऊत यांना ते कसं सांगू शकतात की त्यांनी चौकटीत बोलावे, गुलाबराव पाटील यांनी चौकटीत बोलण्याची सुरुवात स्वत:पासून करावी असा सल्ला राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिला आहे.