सहकार गटाचे नेतृत्व उदय पाटील यांच्याकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:18 AM2021-07-07T04:18:47+5:302021-07-07T04:18:47+5:30
अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाल्यामुळे तब्बल वर्षभरापासून रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा पडघम ...
अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाल्यामुळे तब्बल वर्षभरापासून रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा पडघम केव्हाही वाजण्याची शक्यता आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वात मोठी सरकारी नोकरांची संस्था असलेल्या ग. स. सोसायटीच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. तब्बल ३८ वर्षांपासून सहकार गटाचे नेतृत्व पाहत असलेले संस्थापक अध्यक्ष बी. बी. पाटील यांनी सहकार गटाची धुरा आता सहकार गटाचे गटनेते उदय पाटील यांच्यावर सोपविली आहे. आगामी निवडणूक आता सहकार ग. उदय पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे.
रविवारी सहकार गटाच्या संचालकांसह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एमआयडीसीमधील बालाणी लाॅन्स येथे बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सहकार गटाचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. पाटील हे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आगामी निवडणुकांसाठीची धुरा बी. बी. पाटील यांनी उदय पाटील यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय बैठकीत घेतला. तसेच सहकार गटाचे सर्व अधिकार उदय पाटील यांना सर्वानुमते देण्याची घोषणादेखील करण्यात आली. त्यांच्यासह सहकार गटाचे ज्येष्ठ संचालक अजबसिंग पाटील यांची सहकार गटाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीला चेअरमन एस. एस. पाटील, व्ही. झेड. पाटील, झांबर राजाराम पाटील , उत्तमराव पाटील, रमेश निकम, जे. के. पाटील, सुमन पाटील, आर. एच. बाविस्कर, रमेश शिंदे, दत्तात्रय कोल्हे, अनिल बाविस्कर, राजेश पवार यांच्यासह सहकार गटाचे संचालक कैलास चव्हाण, भाईदास पाटील, महेश पाटील, देवेंद्र पाटील, विक्रमादित्य पाटील, विद्यादेवी पाटील, रागिणी चव्हाण आदी उपस्थित होते.
१९८३ साली झाली होती स्थापना
ग. स. सोसायटीमध्ये सहकार गटाची स्थापना १९८३ मध्ये बी. बी. पाटील यांनी केली होती. तेव्हापासून ते आजतागायत बी. बी. पाटील हेच या गटाचे नेतृत्व करत होते. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत सहकार गटाने एकतर्फी विजय मिळवत २१ पैकी २१ जागा जिंकल्या होत्या. मात्र, २०१९ मध्ये झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत सहकार गटात उभी फुट पडून लोकसहकार गटाची सत्ता ग. स. मध्ये आली होती.
निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला वेग
ग. स. सोसायटीच्या संचालक मंडळाची मुदत जून २०२० मध्येच संपुष्टात आली होती. मात्र, कोरोनामुळे गेल्यावर्षी निवडणुका होऊ शकल्या नाही. दरम्यान, आता कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली असून, राज्य शासनाकडून केव्हाही सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे. ग. स. सोसायटीच्या आगामी निवडणुकीत सहकार, लोकसहकार, लोकमान्य या गटांमध्येच चुरस पहायला मिळणार आहे. यासाठी तिन्ही गटांकडून तयारीला सुरुवात झाली आहे. तर इतरांनीदेखील नवीन
गट स्थापन करून प्रस्थापितांना टक्कर देण्याची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.