उदय वाघ यांच्यासह सात जणांवर गुन्हा तर डॉ. पाटील यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:53 PM2019-04-11T12:53:14+5:302019-04-11T12:53:55+5:30
अमळनेरात परस्पर विरोधी गुन्हे दाखल
अमळनेर : माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, शहराध्यक्षासह ७ कार्यकर्त्यांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे डॉ. पाटील यांच्याविरुद्ध अॅटॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत डॉ. पाटील यांनी म्हटले आहे की, वाघ यांनी तुझे घर उध्वस्त करून टाकू तुला जिवंत राहू देणार नाही... अशा शब्दात दमबाजी करत नाका तोंडातून रक्त पडेपर्यंत लाथ बुक्क्यांनी मारहाण केली. त्याचवेळी भाजप शहराध्यक्ष शीतल देशमुख, राजेश वाघ, पंकज पवार, संदीप वाघ, देवा लांडगे, एजाज बागवान यांनी व्यासपीठावर येऊन मारहाण सुरू केली त्यावेळी गिरीश महाजन, गुलाबराव पाटील व पोलिसांनी कडे करून मला वाचवले. स्मिता वाघ यांची लोकसभेची उमेदवारी रद्द झाल्याचा राग मनात ठेवून त्यांनी हा प्रकार केला गेला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तपास एपीआय प्रकाश सदगीर करीत आहेत
सभापतींची माजी आमदारांविरुद्ध फिर्याद
पंचायत समिती सभापती वजाताई भिल यांनी रात्री उशिरा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, २० मार्च रोजी माजी आमदार डॉ. पाटील यांनी माझा पीए भूषण जैन याच्या भ्रमणध्वनीवर फोन करून सांगितले की खासदारकीची उमेदवारी मिळण्यासाठी समर्थन देण्यासाठी सभापतींना घेऊन ये. मात्र मी गेली नाही म्हणून त्यांनी १० रोजी प्रचारसभेत जातीवाचक शिवीगाळ केली. त्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला डॉ. पाटील यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास डीवायएसपी राजेंद्र ससाणे करीत आहेत.
पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना डॉ. पाटील यांच्या पत्नी ह्या स्मिता वाघ यांच्या अंगावर धावून गेल्याची घटना रात्री घडली.