उदय वाघ यांचा अमळनेर कृउबा सभापतीपदाचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:12 PM2019-07-03T12:12:16+5:302019-07-03T12:13:11+5:30
सदस्य सहलीला रवाना
जळगाव : अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदाचा उदय वाघ यांनी राजीनामा दिला असून तो मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा उप निबंधक मेघराज राठोड यांनी दिली.
२१ जून रोजी भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या आठ दिवसांतच उदय वाघ यांनी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदाचाही राजीनामा दिला. जिल्हा उप निबंधकांकडे दिलेल्या या राजीनाम्यात त्यांनी म्हटले आहे की, वैयक्तीक कारणामुळे आपण वेळ देऊ शकत नसल्याने राजीनामा देत आहे, तो मंजूर करावा.
राजीनामा मिळाल्यानंतर तो मंजूरही करण्यात आल्याचे जिल्हा उप निबंधक मेघराज राठोड यांनी सांगितले. नवीन सभापती निवडीसाठी अमळनेरचे सहायक निबंधक जी.एच. पाटील यांची निवड करण्यात आली असून निवडीची तारीख पाटील हेच ठरवतील, असेही राठोड यांनी सांगितले.
सदस्य सहलीला रवाना
उदय वाघ यांच्या राजीनाम्यानंतर नवीन सभापती निवड कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीत बाजार समितीचे उपसभापती अॅड. एस. एस. ब्रम्हे, प्रफुल्ल पवार, विश्वास बाजीराव पाटील, भगवान कोळी हे सदस्य व उज्ज्वला पाटील, मंगला पाटील, किरण पाटील या महिला सदस्यांचे नातेवाईक सहलीला रवाना झाले असल्याचे समजते. स्वत: उदय वाघ , विजय पाटील हे संचालक अमळनेरात आहेत तर पराग पाटील बाहेरगावी गेले असल्याचे समजते. उदय वाघ यांनी राजीनामा दिला असला तरी बहुमत त्यांच्या गटाचे सिद्ध होत असल्याने विरोधी गटात शांतता आहे.