अमळनेरात समर्थकांनी जाब विचारताच उदय वाघांनी बी.एस.पाटलांना केली मारहाणीस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:40 PM2019-04-11T12:40:38+5:302019-04-11T12:41:19+5:30
समर्थकांनी व्यासपीठासमोर येवून गिरीश महाजन यांच्याकडे स्मिता वाघ यांची उमेदवारी का कापली याबाबत जाब विचारायला सुरुवात केली
जळगाव - मेळाव्याचा ठिकाणी स्वागत-समारंभाचा कार्यक्रम संपल्यानंतर उदय वाघ यांच्या समर्थकांनी व्यासपीठासमोर येवून गिरीश महाजन यांच्याकडे स्मिता वाघ यांची उमेदवारी का कापली याबाबत जाब विचारायला सुरुवात केली. हळू-हळू जाब विचारणाऱ्या वाघ समर्थकांची गर्दी वाढू लागली.
वाघ समर्थकांचे म्हणणे गिरीश महाजन ऐकून घेत असतानाच जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी उठून बाजूलाच बसलेल्या बी.एस.पाटील यांच्या डोक्यावर मारहाण केली आणि काही समजण्याचा आतच वाघ समर्थक थेट व्यासपीठावर चढून आले. त्यानंतर उदय वाघ व समर्थकांनी बी.एस.पाटील यांना लाथा-बुक्कयांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
व्यासपीठावरच मारहाणीला सुरुवात झाल्यानंतर गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वाघ समर्थकांनी थेट गिरीश महाजन यांना धक्का-बुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महाजन यांनी वाघ समर्थकांना व्यासपीठावरून खाली ढकलले. व्यासपीठावरील पदाधिकाऱ्यांनी बी.एस.पाटील यांना बाजूला सारत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या वादामुळे मेळाव्यात एकच गोंधळ उडाला होता.
काही जणांनी गिरीश महाजन यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला केला. त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी थेट वाघ समर्थकांच्या समोर जावून शड्डु ठोकत हिंमत असेल तर मला हात लावून दाखवा असे आव्हान दिले. त्यानंतर गिरीश महाजन यांनी देखील समोर येवून वाघ समर्थकांना आव्हान दिले. पोलिसांनी हा वाद आटोक्यात आणल्यानंतर स्मिता वाघ यांनी माईवव्दारे आपल्या समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन करीत होत्या.
अशा घटल्या घटना
सायंकाळी ४.४५ वाजता - गिरीश महाजन व उन्मेष पाटील यांचे अमळनेरला आगमन
सायंकाळी ५ वाजता - प्रताप मिल कार्यालयात चहापानाचा कार्यक्रम
५.३० वाजता - चहापानाचा कार्यक्रम संपला व वाघ दाम्पत्याचे आगमन
६ वाजता - सर्व नेत्यांचे मेळाव्यास्थळी आगमन
६.१५ वाजता - वादाला सुरुवात
६.३० वाजता - वाद आटोक्यात येवून मेळाव्याला सुरुवात
७ वाजता - मेळावा संपला
भाजपा हा शिस्तबद्ध पक्ष आहे. झालेला प्रकार हा गंभीर आहे. ज्याने हा प्रकार घडवून आणला असेल त्यांना सोडणार नाही. कारवाई ही निश्चित केली जाईल. डॉ.बी.एस.पाटील यांना मारहाण करीत असताना आपण कार्यकर्त्यांना सोडवित होतो. आपल्याला कोणतीही धक्काबुक्की किंवा मारहाण केलेली नाही.
-गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र.
मेळाव्यात जो प्रकार घडला तो पक्षाच्या दृष्टीने दुर्दैवी आहे. मात्र याचा मतदानावर कोणताही परिणाम होणार नाही. ते वैयक्तीक भांडण होते. उमेदवारी कापली गेली व मी पारोळा येथे ए.टी. पाटील यांच्या मेळाव्यात गेलो याचा त्यांना राग होता. मी स्मिता वाघ यांच्याबद्दल काहीही अश्लिल बोललो नाही. मेळाव्याप्रसंगी त्यांनी गोंधळ घातला व माझ्यावर हात उगारला.
-डॉ. बी.एस. पाटील, माजी आमदार.
डॉ. बी. एस. पाटील यांनी माझ्या पत्नीबद्दल अपशब्द वापरले, अपमान केला. हा प्रकार ज्या व्यासपीठावर झाला तो चुकीचा आहे. डॉ. बी.एस.पाटील यांना व्यासपीठावर बोलवू नका, असे आपण सूचित केले होते, तरी त्यांना बोलावण्यात आले. सुरुवातीलाही कार्यकर्त्यांनी त्यांना खाली उतरवा असे सांगितले मात्र त्याची दखल न घेतल्याने कार्यकर्त्यांचा भावनेचा उद्रेक झाला
-उदय वाघ, जिल्हाध्यक्ष भाजप
अमळनेरात पक्षाच्या मेळाव्याप्रसंगी जो प्रकार घडला तो प्रकार म्हणजे कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्यामुळेच झाला आहे.
-स्मिता वाघ, आमदार.