शिवस्मारकाचे अनावरण करुन उध्दव ठाकरेंची वचनपूर्ती; राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पुतळा
By सुनील पाटील | Published: September 10, 2023 04:31 PM2023-09-10T16:31:39+5:302023-09-10T16:31:51+5:30
पिंप्राळ्यातील शिवस्मारकाचे अनावरण करुन शिवसेना प्रमुख (ठाकरे गट) तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी वचनपूर्ती केली.
जळगाव : पिंप्राळ्यातील शिवस्मारकाचे अनावरण करुन शिवसेना प्रमुख (ठाकरे गट) तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी वचनपूर्ती केली. दुपारी १२.१५ वाजता ठाकरे यांचे पिंप्राळ्यात आगमन झाले. सर्वात आधी कोनशिलेचे अनावरण त्यांनी केले. त्यानंतर पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. भगव्या कापडात झाकण्यात आलेला हा भव्य पुतळा ठाकरेंच्याहस्ते खुला करण्यात आला.
उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या संकल्पनेतून पिंप्राळ्यात भव्य असे शिवस्मारक उभारण्यात आले आहे. २३ एप्रिल रोजी उध्दव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्याहस्ते या शिवस्मारकाचे भुमीपूजन झाले होते. त्याचवेळी या स्मारकाच्या उद्घाटनाला आपण येऊ व तेव्हा जळगावकरांशी संवाद साधू असे वचन ठाकरे यांनी दिले होते. त्याची वचनपूर्ती रविवार दि.१० सप्टेबर रोजी ठाकरे यांनी केली. पिंप्राळ्यातील हा पुतळा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आहे. खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्क प्रमुख संजय सावंत, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, वैशाली सूर्यवंशी आदी शिवस्मारकाच्या ठिकाणी उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणास्तव मोजक्याच लोकांना प्रवेश देण्यात आला होता. कुलभूषण पाटील यांच्या पत्नी उज्ज्वला पाटील यांनी उध्दव ठाकरे यांचे औक्षण केले. यावेळी त्यांचे वडिल विरभान पाटील, आई सुमन पाटील, मुलगा देवेश, जय, दिव्या व भाऊ, वहिणी असा परिवार होता. ठाकरे यांनी या कुटूंबाशी संवादही साधला. त्यानंतर पुतळ्याचे अनावरण केले. या कार्यक्रमानंतर ठाकरे वासू कमल विहार या अपार्टमेंटमध्ये माजी नगरसेवक अमर जैन यांच्याकडे गेले. तेथे ३० मिनिटे थांबून सभास्थळी गेले.
पुष्पवृष्टी अन् नृत्य
उध्दव ठाकरे यांचे आगमन झाले तेव्हा त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. पुतळा अनावरण झाल्यानंतर पिंप्राळेकरांनी नृत्य करुन आनंदोत्सव साजरा केला. गुलाबी ढोल पथकानेही लक्ष वेधून घेतले होते. पिंप्राळेकरांना अभिवादन करुन ठाकरेंचा ताफा तेथून निघाला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.