"मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली"- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By Ajay.patil | Published: November 12, 2024 10:18 PM2024-11-12T22:18:47+5:302024-11-12T22:20:02+5:30
धरणगावच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
जळगाव : महाविकास आघाडीचे सरकार विकासविरोधी होते आणि उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली म्हणूनच अशा लोकांच्या विरोधात आम्ही उठाव केला असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी संध्याकाळी धरणगाव येथे आयोजित जाहीर सभेत केला.
जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शिंदे सेनेचे उमेदवार तथा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रचारासाठी ही जाहीर सभा झाली. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, भाजपचे जळगाव तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
फेसबुकवरून राज्य चालविता येत नाही
आपल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेल्या निवडणुकीत जनतेने भाजप-शिवसेना युतीला कौल दिला होता. मात्र, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत जात महाविकास आघाडीचे सरकार तयार केले. ते अडीच वर्षाचे सरकार प्रत्येक कामांना स्थगिती देणारे, विकास विरोधी सरकार होते. उठाव करण्याचा निर्णय हा स्वाभिमानासाठी आणि काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडविण्यासाठी होता. केवळ फेसबुक वरून राज्य चालवता येत नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
लाडक्या बहिणी समोरच्याचे डिपॉझिट जप्त करतील
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी खटाटोप केला. आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणी समोरच्यांचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही. लाडक्या बहिणी, शेतकरी व युवक या निवडणुकीत महायुतीच्या पारड्यात मतांचे गुलाब टाकतील तर महाविकास आघाडीला केवळ काटे मिळतील, असे ही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
गुलाबराव तुम्हाला प्रचाराची काय गरज...
- गुलाबराव पाटील हे २४ तास काम करणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांना प्रचाराची गरज नाही. ते आजच विजयी असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
- लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांकडून फेक नॅरेटिव्ह निर्माण करण्यात आले. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात फटका बसला. मात्र जळगावकरांनी त्याला थारा दिला नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
समाजाच्या नावावर राजकारण करतात, समाजासाठी केले काय? - गुलाबराव पाटील
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्धी उमेदवार गुलाबराव देवकर यांच्याकडून समाजाच्या नावावर राजकारण केले जात आहे. मात्र देवकर यांनी आतापर्यंत समाजासाठी काय केले असा प्रश्न गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात केला.